घरलाईफस्टाईलजाणून घ्या आषाढी एकादशीबद्दल...

जाणून घ्या आषाढी एकादशीबद्दल…

Subscribe

आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी

आषाढ महिना म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पंढरपूरच्या वारीचा काळ मानला जातो. अनेक संतांच्या पालख्या आषाढी एकादाशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात. त्यासोबत असंख्य लोक दिंड्यांमधून पायी चालत विठोबाचे वारकरी म्हणून मोठ्या भक्तीभावाने पंढरीला पोहोचत असतात. फक्त वयोवृद्धच नाही तर त्याच्यासह असंख्य तरुणही त्याच उत्सुहाने, भक्तिभावाने या वारीत सहभागी होतात. परदेशी लोकही आवर्जुन ही विठ्ठलभक्तीची वारी पाहण्यासाठी भारतात येत असतात आणि भारतात असलेल्या या अनोख्या परंपरेचा अनुभव घेतात.

लाखोंचा समुदाय विठ्ठलच्या चरणी लीन

वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे वेगळे महत्व आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळयासमोर येते ती पंढरपुरची वारी आणि सावळा विठ्ठल. गेले शतकानुशतके शेकडो किलोमीटर चालत भक्तीभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठ्ठलच्या चरणी लीन होतो. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे.

- Advertisement -

आषाढीच्या वारी म्हणजे सुगीचा काळ

आषाढी एकादशीला या दिवशी पंढरपुरमध्ये आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करुन वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो. या आषाढीच्या दिवशी वारकरी सावळ्या विठूरायाचे मनोहर रूप पाहण्यासाठी चालत वारीस निघतात आणि एकादशीला पंढरपुरात गेल्यानंतर डोळेभरून साठवलेले रुप हे वारकरी वर्षभऱ आठवत आपले जीवन जगत असतात.

या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात

या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्‍तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.

- Advertisement -

अशी आहे व्रत करण्याची पद्धत

  • एकादशीला प्रातःस्नान करुन तुलसी वाहून विष्णुपूजन केल्यानंतर हा संपूर्ण दिवस उपास केला जातो.
  • रात्री हरिभजनात जागरण करायचे.
  • आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा केल्यानंतर हे पारणे सोडले जाते.
  • या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. इतके दिवस ज्या विठ्ठलासाठी चालत आलो ते अखेर भेटल्याने आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात. शहरातही जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करुन मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -