घरलाईफस्टाईलमहिला कर्मचार्‍यांसाठी कामाचे ठिकाण असावे अनुकूल 

महिला कर्मचार्‍यांसाठी कामाचे ठिकाण असावे अनुकूल 

Subscribe

पुरुष कर्मचार्‍यांप्रमाणेच स्त्री कर्मचारीही कंपनीच्या उत्तुंग कामगिरीसाठी दिवस रात्र मेहनत घेत असतात. जवळपास सर्वच क्षेत्रात आज महिला मोठ्या संख्येने काम करतानाचे चित्र आपण पाहत आहोत. आज महिलासुद्धा नोकरी, करिअरच्या बाबतीत सुविधा, कामाच्या ठिकाणी बढती, वेतन आदी बाबींचा विचार करूनच करिअरचा निर्णय घेतात. कंपनीच्या नफ्यासाठी तसेच उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कुशल कर्मचार्‍यांची निवड करणे, तसेच ते टिकवून ठेवणे आवश्यक असते. अनेकदा कामाच्या ठिकाणी असलेल्या असुविधा यामुळे कुशल महिला कर्मचार्‍यांना गमावण्याची वेळ कंपनीवर येते. कामाचे ठिकाण महिला कर्मचार्‍यांसाठी अनुकूल असावे. जेणेकरून महिला कर्मचार्‍यांना गमावण्याची वेळ कंपनीवर येणार नाही.

बाळ संगोपनाची सुविधा

कंपनीतील महिला कर्मचार्‍यांच्या लहान मुलांसाठी बाळ संगोपनाची व्यवस्था असल्यास महिला कर्मचारी निश्चिंत होऊन काम करतात. कामाच्या ठिकाणी बाळ संगोपनाची व्यवस्था करता येत नसल्यास कंपनीतर्फे अन्य ठिकाणी तशी सुविधा करता येते का ते पहावे. अशावेळी कामाच्या ठिकाणी जवळपास असणार्‍या बालसंगोपन केंद्रांशी हात मिळवून, सवलत घेता येईल अशी सुविधा पहावी.

- Advertisement -

पदोन्नतीसाठी संधी

कंपनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तसेच कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी पुरुष कर्मचार्‍यांप्रमाणे महिला कर्मचारीही बरोबरीने काम करत असतात. मात्र, अनेकदा महिला कर्मचार्‍यांना त्यांच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळत नाही. परिणामी निराश होऊन महिला कर्मचारी कंपनी, काम सोडण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे कंपनीला एक कुशल कर्मचारी गमावण्याची वेळ येऊ शकते. तेव्हा स्त्री पुरुष असा भेदभाव न करता पुरुष कर्मचार्‍यांप्रमाणेच कंपनीतील स्त्री कर्मचार्‍यांनाही पदोन्नतीची समान संधी दिली पाहिजे. असे केल्याने स्त्री कर्मचार्‍यांचे कंपनीबाबतीतील सकारात्मक मत वाढून महिला कर्मचारीही उत्साहाने, जबाबदारीने काम करतील.

मातृत्व, पालकत्व रजा

महिला कर्मचार्‍यांसाठी मातृत्व आणि पालकत्व रजा देणे हे कायद्याने आलेच. मात्र, अनेकदा बाळाच्या संगोपनासाठी किंवा बाळाच्या आजारपणात महिलांना वाढीव मातृत्व रजेची आवश्यकता असते. तेव्हा अशावेळी कंपनीतर्फे महिला कर्मचार्‍यांशी संवाद साधून तत्काळ अशा रजेची सोय करून देणे गरजेचे आहे. असे केल्याने महिला कर्मचार्‍यांचा कंपनीबाबतीत विश्वास वाढतो.

- Advertisement -

आरोग्यदायी स्वास्थ्यासाठी विविध उपक्रम

अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांच्या स्वास्थ्यसंदर्भात विशेष काळजी घेतली जाते. विशेषकरून महिला कर्मचार्‍यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कंपन्यांतर्फे स्वास्थ्यसंदर्भात विविध प्रकारच्या आरोग्यदायी उपक्रमांचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. अशावेळी लहान कंपन्यासुद्धा महिला कर्मचार्‍यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवू शकतात. स्थानिक व्यायामशाळांशी भागीदारी करत कामाच्या ठिकाणी महिला कर्मचार्‍यांसाठी योगा क्लास, मोफत मेडिकल चेकअप सारख्या आरोग्यदायी उपक्रम राबविल्याने महिला कर्मचार्‍यांचे आरोग्य सुदृढ राहील.

महिला कर्मचार्‍यांची सुरक्षा

आता तर पुरुष कर्मचार्‍यांप्रमाणे महिलाही रात्री उशिरापर्यंत काम करतात. आपल्या सुरक्षिततेची तसेच कल्याणासाठी महिला कर्मचारी कंपनीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कंपनीवर असते. तेव्हा कामाच्या ठिकाणी आणि कंपनी परिसरात महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कंपनीकडून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. अनेकदा असुरक्षित वातावरणामुळे महिला कर्मचारी काम सोडत असल्याच्या घटना घडल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -