घरमहाराष्ट्रनागोठण्यात दहा लाखांच्या गुटख्यावर धाड

नागोठण्यात दहा लाखांच्या गुटख्यावर धाड

Subscribe

एफडीएची कारवाई, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मिळालेल्या गुप्त माहितीवरून पेणच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने मंगळवारी मध्यरात्री शहरातील एका इमारतीमधील गोदामावर धाड टाकून पान मसाल्याच्या गोणींसह विविध प्रकारची रसायने ताब्यात घेतली. या मालाची किंमत १० लाख २७ हजार ५८० रुपये इतकी असून, इमारतीच्या मालकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींच्या नावाबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील शंभू पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यावरील खोली क्रमांक ४ मध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या पान मसाल्याचा साठा असल्याची माहिती एफडीएला मिळाल्याने सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांच्या नेतृत्त्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, सुप्रिया जगताप, प्रियांका भांडारकर, नमुना सहाय्यक मनोहर नागेश वत्स यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने त्या ठिकाणी धाड टाकून हा साठा हस्तगत केला. सुगंधी तंबाखू आणि पानमसाला या अन्न पदार्थांचे उत्पादन, साठा, वाहतूक आणि विक्रीसाठी प्रतिबंध असल्याचे माहीत असतानाही त्याचे उल्लंघन केल्याने तिघांसह खोली देणार्‍या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अलिबागचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उप विभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजयकुमार देशमुख अधिक चौकशी करीत आहेत.

जप्त करण्यात आलेला साठा 
•विमल पान मसाला (किंमत ६,७३,२०० रुपये)
•व्ही १ टोबॅको (२,२०,०००)
•आरएमडी पान मसाला (१७,२८०)
•मेहेक सिल्व्हर पान मसाला (६४,१२५)
•मिक्सर ऑफ ओडरीफेरस सबस्टनसेस (२४,१२०)
•पॅराफिन द्रव्य (२४००)
•मॅग्नेशियम कार्बोनेट (१४५५)
•रिकामे पाऊच आणि रोल बंडलाचे बॉक्ससह प्लास्टिक गोणी (१६,०००)
•सुपारी आणि कात बारीक करण्यासाठी चक्कीसारखे स्टीलचे मशिन (६०००)
•मोठा आणि छोटा इलेक्ट्रॉनिक वजन काटा (३०००)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -