एकलहरे वीजनिर्मिती प्रकल्पातील २५० कर्मचार्‍यांवर बदलीची टांगती तलवार

१८ अभियंत्याच्या बदल्या, संच बंद करण्याच्या हालचालींना वेग

श्रीधर गायधनी, नाशिकरोड

एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात नव्याने ६६० मे. वॅ. प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रकल्प बचाव संघर्ष कृती समिती, कामगार, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरु असतांनाच एकलहरेतील आहे तेच संच बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकलहरे प्रकल्पातील तब्बल १८ कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. एकलहरेतील संच क्रमांक पाच बंद करण्याचा घाट घातल्याच्या चर्चेने सुमारे अडीचशे कामगार व अधिकार्‍यांवर बदलीची टांगती तलवार आहे. दरम्यान, कामगार संघटना आक्रमक झाल्या असून नवीन संच सुरु झाल्याशिवाय जुने संच बंद करण्याचा घाट घालू नये, अशी मागणी करत संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

एक वर्षापूर्वी वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबई कित्येक तास अंधारात गेल्यावर राज्य शासनाने तातडीने बंद पडलेला वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसांत दुसरा संच सुरु करण्यात आला होता, एकलहरे वीजनिर्मिती केंद्र केवळ मुंबईंसाठी स्टँडबाय ठेवण्यात आल्याने संकटकालीन उपाययोजना म्हणून एकलहरे प्रकल्पाकडे पाहिले जात असतांना कामगार व अधिकारी यांच्या संख्येत कपात करण्याविषयी मुंबई मुख्यालयातून माहिती मागवली आहे, त्या प्रमाणे गेल्या महिन्यात येथील तब्बल १८ अधिकार्‍यांना पदोन्नतीने राज्यातील इतर वीज निर्मिती केंद्रात पाठवण्यात आले आहे. अधिकारी व कामगारांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

६६० मे.वॅ. सुरु केल्याशिवाय संच बंद करण्याचा विचार नको : कामगार संघटना

मुख्यमंत्री, उर्जा मंत्री, व वीज कंपनीच्या मुख्य अभियंता यांना प्रकल्पातील विविध ११ कामगार संघटनांनी निवेदन देवून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवेदनात, आहे तो संच बंद करण्याचा निर्णय घेतांना संघटना प्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही, ६६० मे.वॅ. प्रकल्पाला मंजूर मिळवण्यासाठी प्रयत्न न करता आहे ते संच बंद करण्याचा घाट घातला आहे, नवीन संच चालू झाल्याशिवाय आहे ते संच बंद करण्याचा विचार करु नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संयुक्त कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

पदोन्नती झाल्याने इतर ठिकाणी पाठवले

कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नती झालेल्या आहेत, पदोन्नती झाल्याने व कालावधी जास्त झालेल्या अधिका-यांचा समावेश आहे, संच बंद करण्याचा कोणताही विचार नाही, तुम्हाला मिळालेली माहिती चुकिची आहे, अतिरिक्त जागा नसल्याने त्यांना कंपनीच्या इतर ठिकाणी रिक्त असलेल्या जागांवर पदोन्नती देण्यात आली आहे.
– एन. एम. शिंदे, मुख्य अभियंता, एकलहरे वीजनिर्मिती