घरमहाराष्ट्रमुंबईत एकाच दिवशी २७ रुग्णांचा मृत्यू

मुंबईत एकाच दिवशी २७ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

मुंबईमध्ये शुक्रवारी आतापर्यंतचे सर्वाधिक ७५१ करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर शनिवारी तब्बल २७ जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. रुग्णसंख्या वाढण्याबरोबरच मृतांच्या संख्येत वाढ होणे, ही बाब मुंबईसाठी चिंताजनक ठरत आहे.मुंबईत शनिवारी तब्बल ५४७ रुग्ण सापडल्याने करोनाबाधितांचा आकडा ८१७२ वर पोहचला आहे. यामधील १९० रुग्णांच्या चाचण्या २९ ते ३० एप्रिलदरम्यान केल्या होत्या. त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला आहे. त्याचवेळी शनिवारी तब्बल २७ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत मुंबईत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात करोनामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील मृतांची संख्या ३३२ इतकी झाली आहे. मृतांमध्ये २० रुग्ण हे दीर्घकाळ आजारी होते. यामध्ये २० पुरुष तर ७ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १२ जण हे ६० वर्षांवरील तर १५ जण हे ४० ते ६० च्या दरम्यान आहेत.

मुंबईत करोनाचे ४८१ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित करोना रुग्णांची संख्या १० हजार ९९५ वर पोहचली आहे. तसेच १३७ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १७०४ जणांना घरी सोडण्यात आले असून यातील १४५ रुग्ण मुंबई बाहेरील आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

- Advertisement -

राज्यात करोनाबाधितांची संख्या 12 हजार पार, एकाच दिवसात 36 जणांचा मृत्यू

राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम असून, शनिवारी एका दिवसांत तब्बल छत्तीस जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा मृतांचा हा सर्वाधिक आकडा आहे. राज्यातील मृत्यूंची संख्या ५२१ झाली आहे. राज्यात शनिवारी ७९० नवीन करोना रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तसेच आतापर्यंत २ हजार जण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात मृत्यू झालेल्या ३६ करोनाबाधित रुग्णांपैकी मुंबईमध्ये सर्वाधिक २७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोनाबधित रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मुंबईसाठी ही बाब चिंताजनक ठरत आहे. मुंबई खालोखाल पुणे ३, अमरावती २, तर वसई विरार १, अमरावती जिल्ह्यामधील १ तर औरंगाबाद मनपामधील १ मृत्यू आहे. या शिवाय पश्चिम बंगालमधील एकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. मृतांमध्ये २८ पुरुष तर ८ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील १९ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत, तर एक जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी ३ जणांची इतर आजाराबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये ( ७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. शनिवारी १२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २ हजार करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,६१,०९२ नमुन्यांपैकी १,४८,२४८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर १२,२९६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ८४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून शनिवारी एकूण १०,५१३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४४.४० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात १,७४,९३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२,६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -