घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरया सरकारचा पायगुण चांगला नाही म्हणूनच... अजित पवारांची जोरदार टीका

या सरकारचा पायगुण चांगला नाही म्हणूनच… अजित पवारांची जोरदार टीका

Subscribe

ज्यापद्धतीने महाराष्ट्राचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. जर हे अशाच पद्धतीने घडत राहिलं. तर देशात आणि राज्यात देखील स्थिरता राहणार नाही. जी देशाला, महाराष्ट्राला परवडणारी नाही. प्रशासनाचा देखील यावरून विश्वास उडेल. प्रशासन देखील चांगल्या पद्धतीने चालणार नाही. ज्या प्रकारे एक गट बाजूला गेला आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली. निवडणूक आयोग जर अशा पद्धतीने निर्णय द्यायला लागलं तर कसं होणार?, सुप्रीम कोर्टाकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. न्याय देवतेवर सर्वांचा विश्वास आहे. निश्चितपणे न्याय देवता न्याय देईल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

मराठवाडा ही साधूसंतांची भूमी आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी मराठवाड्याने सर्वस्व अर्पण केलेलं आहे. वारकरी सांप्रदायिकता येथे मोठ्या प्रमाणावर आहे. काहीजण फक्त वातावरण खराब करून महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज उद्योगपती राज्यात गुंतवणूक करायला तयार नाही. राज्यातलं वातावरण चांगलं राहिलं नाही, तर कुणीही येथे गुंतवणूक करायला येणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंच्या काळात दीड लाख लोक कामाला लागतील असे उद्योग येथे येत होते. यांचा पायगुण चांगला नाही. हे आल्यानंतर सगळे उद्योग परराज्यात गेले. दोष द्यायचा कुणाला? ७५ हजार नोकऱ्या आणणार म्हणाले, पण कधी भरणार? तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार चालू आहे. सर्वोच्च न्यायालय म्हटलं की, हे नपुंसक सरकार आहे. अरे या सरकारला काही जनाची नाही तर मनाचीही वाटत नाही का? या पद्धतीने हे सरकार चालवतायत का?, असा सवाल पवारांनी उपस्थित करत शिंदे सरकारवर टीका केली.

यांना गौरवयात्रा काढायचं सुचतंय. तुमच्यात धमक असेल, खरंच सावरकरांबद्दल तुम्हाला आदर-अभिमान असेल तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. तुमच्यात आहे का हिंमत? फक्त महागाई, बेरोजगारीवरून दुसरीकडे लक्ष जाण्यासाठी हे चाललंय. संभाजीनगरमध्ये हिंसक घटना घडण्याचं काय कारण होतं? मविआची सभा होऊ नये म्हणून? ही कुठली लोकशाही?, असं पवार म्हणाले.

- Advertisement -

मराठवाडा परिसरामध्ये येथील मातीचा आणि मराठी माणसांचा गुण घेण्यासारखा आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर आणि देशावर संकट येतं. त्याविरोधात मराठी माणूस हा पेटून उठतो. तसेच एकजूट होऊन दाखवतो आणि लढतो. महाविकास आघाडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वतीने एक बळकट निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याकरिता सगळेजण जिवाचं रान करतील. सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मविआचा कणा म्हणून लढतील. त्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही, असं अजित पवार म्हणाले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. प्रबोधनकार ठाकरेंनी या संघटनेचं नाव काय असावं हे त्याकाळात सांगितलं आणि धनुष्यबाण सर्वदूर पोहोचवण्याचं कम केलं. आम्ही सुद्धा राज्यकर्ते आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली. परंतु अशा पद्धतीने कुठला निकाल दिलेला आम्ही तरी कधीही ऐकलेला नाही. सरकार आल्यानंतर कुठेतरी स्थिरता यावी, कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नयेत. संविधानापुढे आम्ही नतमस्तक झालो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आदर भारतातल्या तमाम जनतेने केला पाहिजे. तसेच कायद्याचा आणि घटनेचा आदर केला पाहिजे. परंतु याला तिलांजली देण्याचं काम केलं, असंही अजित पवार म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. आजच्या या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. तसेच पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.


हेही वाचा : हे तर वज्रझूठ.., सत्तेसाठी हपापलेली लोकं एकत्र आली आहेत, मुख्यमंत्री शिंदेंची मविआवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -