घरमहाराष्ट्रपुणेPawar Vs Pawar : सख्खा भाऊच अजितदादांच्या विरोधात; श्रीनिवास म्हणाले, तुमच्यासारखा नालायक...

Pawar Vs Pawar : सख्खा भाऊच अजितदादांच्या विरोधात; श्रीनिवास म्हणाले, तुमच्यासारखा नालायक कोणी नाही

Subscribe

बारामती – अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फोडून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही निवडणुक आयोगाकडून मिळवला आहे. आता देशात सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहात आहे. बारामतीमधून उमदेवारांची घोषणा झाली नसली तरी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढत नक्की झाली आहे. बारामतीमध्ये प्रथमच पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या रिंगणात नणंद, भावजय असल्या तरी खरी लढत ही काका विरुद्ध पुतण्या अशीच होणार आहे. आता पवार कुटुंब या लढतीत कोणाच्या बाजूने आहे, ते समोर यायला लागले आहे.

अजित पवार यांचे सख्खे ज्येष्ठ बंधू श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळेंना साथ देण्याचे ठरवले आहे. बारामतीमधील गावांमध्ये जाऊन ते अजित पवारांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. श्रीनिवास पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये श्रीनिवास पवार हे प्रत्येक नात्याची एक्सपायरी डेट असते, अजित पवारांसोबतच्या नात्याची एक्सपायरी डेट झाली असल्याचे सांगत आहेत.

- Advertisement -

श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. त्यांचा मुलगा युगेंद्र पवार यांनी आधीच आत्याच्या अर्थात सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. आता अजित पवारांचा सख्खा भाऊ श्रीनिवास पवार त्यांच्याविरोधात प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. ते म्हणाले की, शरद पवार यांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. आज ते 83 वर्षांचे आहेत. अशा काळात त्यांना एकटे सोडले आहे. हे मला पटलेले नाही. मी कोणाच्याही दबावात नाही. कारण मी लाभार्थी नाही.

काटेवाडीतील एका बैठकीत श्रीनिवास पवार म्हणाले की, तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की मी दादांच्याविरोधात कसा काय गेलो? चांगला काळ असो, वाईट काळ असो मी कायम त्यांच्या सोबत राहिलो. त्यांनी जे काही निर्णय घेतले त्यांना साथ दिली. भाऊ म्हणून ते म्हणतील तशी मी उडी मारली. कधी विचारले नाही की असं का करावे लागेल. पण जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आमदार पद तुमच्याकडे आहे, तेव्हा खासदारकी शरद पवारांना दिली पाहिजे असे मी सांगितले. कारण शरद पवारांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांचे वय आता 83 झालं आहे. या काळात त्यांना सोडणं मला पटलं नाही, असे श्रीनिवास पवार म्हणाले.

- Advertisement -

तुमच्यासारखा नालायक कोणी नाही

अजित पवार यांचा लाभार्थी असा उल्लेख करुन श्रीनिवास पवार म्हणाले, इथून पुढची वर्षे अजित पवारांची आहेत, असं माझे काही मित्र मला म्हणाले. वयस्कर झालेल्या माणसाची आपण काही किंमत करत नाही, हा विचारच मला काही पटला नाही. ते शब्द माझ्यासाठी वेदनादायी होते. पुढची पाच, दहा वर्ष दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही हे करत आहात. वयस्कर माणसाचा सन्मान तुम्ही करत नसाल तर तुमच्यासारखा नालायक माणूस कोणी नाही असे माझे मत आहे, अशी टीका त्यांनी अजित पवारांवर केली.

वडिलांनी शेती आपल्या नावावर करुन दिली म्हणून त्यांना काही घराबाहेर काढायचे नसते, असे सांगत श्रीनिवास पवार म्हणाले, ज्यांना कोणाला पदं मिळाली ती शरद पवारांमुळे मिळाली. आता त्यांचे वय झाले म्हणून त्यांना घरात बसा, कीर्तन करा असं म्हणणं माझ्या मनाला पटलेलं नाही.

अजित पवारांसोबतच्या नात्याची एक्सपायरी

अजित पवारांसोबतच्या नात्याची एक्सपायरी झाल्याचे सांगत श्रीनिवास पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला लागले आहेत. ते म्हणाले की, आपण औषधी आणतो त्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. तशीच काही नात्यांचीही एक्सपायरी डेट असते. ती नाती आता एक्सपायर झाली आहेत असे समजायचे आणि पुढे चालत राहायचे असते. त्याचे काही वाईट वाटून घ्यायचे नसते.

अजित पवारांनाही झोप येत नसेल…

आयुष्य एकदाच आहे. ते स्वाभिमानाने जगायचे आहे. कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जाणे मला पटत नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर आता त्यांनाही झोप येत नसेल असे श्रीनिवास पवार म्हणाले.

शरद पवारांनी काय केले, असा सवाल अजित पवार आता करत आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीनिवास पवार म्हणाले, त्यांनी चार वेळेस तुम्हाला उपमुख्यमंत्री केले. 25 वर्षे मंत्री केले. तरीसुद्धा म्हणायचे काकाने माझ्यासाठी काय केले? असा काका मला मिळाला असता तर मी खुश झालो असतो. असा त्रास देणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली असती तर कोणाला नको आहे, अशी टीका सख्ख्या भावावर केली.

भाजप-आरएसएसने शरद पवारांना संपवण्यासाठी घर फोडले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शरद पवार हे नाव संपवायचे आहे. त्यासाठी कित्येक वर्षांपासून त्यांनी प्रयत्न चालवले होते. पण ते काही त्यांना शक्य होत नव्हते.धार्मिक ग्रंथात पाहिले, देवी-देवतांपासून, इतिहासापासून आतापर्यंतचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की घरातील व्यक्ती फोडल्याशिवाय घर फोडता येत नाही. घरातील व्यक्तीच फक्त घरातील ज्येष्ठांना घाबरत नाही. त्यामुळेच भाजपने पवारांचे घर फोडले आहे, असा आरोप त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -