घर महाराष्ट्र अजितदादा सत्तेतून बाहेर पडा; मराठा आंदोलकांच्या बारामतीत घोषणा, सरकारला 'हा' इशारा

अजितदादा सत्तेतून बाहेर पडा; मराठा आंदोलकांच्या बारामतीत घोषणा, सरकारला ‘हा’ इशारा

Subscribe

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) बंडखोरी केल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी जेव्हा बारामती (Baramati) दौरा केला, तेव्हा त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. मात्र आता त्याच बारामतीमधून अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी मागणी करण्यात येत आहे. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ आज (4 सप्टेंबर) बारामतीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. याचदरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी अनेकांनी जाहिरपणे बोलून दाखवले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार असमर्थ असेल तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे. आता मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनानंतर अजित पवार काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Ajitdada out of power Maratha protestors declaration in Baramati warning to the government)

हेही वाचा – ‘भाजपला 25 आमदार निवडून देण्यात माझं योगदान’; पंकजा मुंडेंचा दावा

मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारच्या निषेधार्थ आज मराठा समाजाच्यावतीने बारामतीत कडकडीत बंद पाळून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘सरकारचा भरलाय घडा, अजितदादा सत्तेतून बाहेर पडा’, अशा घोषणांनी आज मराठा आंदोलकांनी बारामती दणाणून सोडली. बारामतीच्या कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी उद्यानापासून मोर्चा काढण्यात आला. गुनवडी चौक, गांधी चौक, सुभाष चौकमार्गे भिगवण चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी ‘सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर, आगामी सर्व निवडणुकांवर मराठा समाज बहिष्कार घालेल. एकही मराठा मतदार मतदान करणार नाही. वेळप्रसंगी बारामतीतूनच आम्ही दोनशे कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभे करु, असा थेट इशारा बारामतीतील आंदोलकांनी दिला आहे.
- Advertisement -

सरकारचा केला निषेध

बारामतीतील मोर्चादरम्यान अनेक आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर, अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी तीव्र भूमिका घोषणांच्या माध्यमातून व्यक्त केली. अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आरक्षणाच्या मागणीसाठी दिरंगाई होत असल्याबद्दल सरकारचा यावेळी निषेध केला. तसेच आरक्षणाच्या मुद्यावर सर्वच नेतेमंडळींनी मोर्चात सहभागी व्हायला हवे होते, आमच्या मागणीला पाठिंबा द्यायला हवा होता, अशी भावनाही मराठा आंदोलकांनी व्यक्त केली.

आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत

मराठा समाजाच्या वतीने मागितले जाणारे आरक्षण कोणावरही अन्याय करणारे नाही. ते आमच्या न्याय हक्काचे आहे. आम्ही कोणाचेही आरक्षण डावलून आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करत नाही आहोत. तर, आम्ही आमच्या हक्काचेच आरक्षण मागत आहोत. असे मनोगत कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले. बारामतीतील आयोजित मोर्चात प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, तहसीलदार गणेश शिंदे निवेदन स्विकारण्यासाठी उपस्थित होते.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -