घरमहाराष्ट्रअनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगात ! ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी

अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगात ! ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी

Subscribe

अंमलबजावणी संचालनालयाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. देशमुख यांना मंगळवारी कोर्टात हजर केले असता त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात १२ तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी रात्री उशिरा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली होती.

अनिल देशमुख यांची मंगळवारी सकाळी जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली. अनिल देशमुखांना अटक करण्यात आलेले मनी लाँड्रिंग प्रकरण महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील एका कथित खंडणी टोळीशी संबंधित आहे. देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे, असे ईडीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. देशमुख यांनी चौकशीदरम्यान प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले, असा दावा त्यांनी केला. ईडीने कोर्टात १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

- Advertisement -

अ‍ॅड. विक्रम चौधरी आणि अ‍ॅड. इंद्रपाल सिंग यांनी देशमुख यांच्या बाजूने कोर्टात युक्तिवाद केला. देशमुख यांचे वय झाले आहे. त्यांचा खांदा निखळलेला आहे. त्यामुळे त्यांना एक सहकारी देण्यात यावा. तसेच त्यांना घरचे जेवण देण्यात यावे. त्यांना हायपर टेन्शन आहे आणि त्यांना कोविडची बाधाही झाली होती. त्यामुळे त्यांना कोठडी देऊ नये अशी मागणी या दोन्ही वकिलांनी केली होती. मात्र, देशमुख हे तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांना अनेक नोटीसा पाठवल्यानंतरही ते चौकशीला आले नाहीत. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांना कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंतची ईडी कोठडी सुनावली.

विशेष कोर्टाने अनिल देशमुख यांच्या कोठडीदरम्यान घरचे अन्न आणि औषधे मिळण्यासाठी केलेल्या अर्जाला परवानगी दिली आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी कोर्टात ईडीच्यावतीने युक्तिवाद केला.

- Advertisement -

अनिल देशमुख काल स्वत:हून ईडीकडे हजर झाले. ते काल वकिलांसोबत हजर झाले. रात्री 12.30 वाजेपर्यंत त्यांची चौकशी झाली. त्यानंतर त्यांना अटक केली. मला सहकार्य करायचे आहे. फक्त चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी. जे काही आरोप करण्यात आले आहे, ते केवळ द्वेष भावनेतून करण्यात आले आहे, असे देशमुखांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -