घरफिचर्समायमहानगर ब्लॉगफडणवीस बॉम्ब फोडतील की लवंगी!

फडणवीस बॉम्ब फोडतील की लवंगी!

Subscribe

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारे दररोज नवनवीन धक्कादायक पुरावे आणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपच्या नेत्यांना जेरीस आणले आहे. ड्रग्स पेडलर्स आणि भाजपच्या नेत्यांचा संबंध काय, असा सवाल करीत मलिक यांनी पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल संशय मात्र निर्माण केला. त्यानंतर फडणवीस यांनीही मलिक यांच्यावर पलटवार केला. फडणवीस यांनी दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, अशी डरकाळी फोडल्याने आता राजकीय युद्ध नाही तर महायुद्ध सुरू झाल्याची चुणुक मिळत आहे. आता फडणवीस खरोखर बॉम्ब फोडतात की लवंगी, हे दिवाळीनंतरच कळेल.

उठा उठा दिवाळी आली! दीपावलीच्या शुभपर्वास सुरुवात झाली असून उद्या आहे नरकचतुर्दशी. पुढील तीन दिवस घरोघरी दिवाळीचा गोडवा सर्वांना अनुभवायला मिळेल. दिवाळी म्हटल्यावर आनंदाचे वातावरण. मुले, मुली फराळासोबत फटाकेही फोडत असतात. मुलांना फटाक्यांमुळे कोणतीही इजा होऊ नये म्हणून वडील मुलांसोबत फटाके फोडायला जातात. दिवाळी म्हटल्यावर फराळाप्रमाणे फटाके फोडल्यानंतरचा आनंद हा चेहर्‍यावर दिसत असतो. त्यात लवंगी, सुरसुरी, डबलबार, आपटीबार, रॉकेट, सुतळी बॉम्ब हे फटाके दिवाळीत फुटत असतात. आकाशातही रंगबेरंगी फटाके फुटलेले दिसताना दिवाळीचा फिल येत असतो.

फटाक्यांचा हा फिल गुड मात्र राजकीय नेत्यांना नको नकोसा वाटतो. कारण राजकारणात फटाके फुटणार म्हणजे कुणाची तरी वाट लागणार किंवा बत्ती लागणार असाच सर्वार्थ राजकाणात रूढ झालाय. मागील तीन महिन्यांत राज्यातील राजकाणात महत्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळेच आयकर खाते, सीबीआय, ईडी, एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणांनी आपली कार्यालये अ‍ॅक्टिव्ह केली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात ज्या पद्धतीने धाडी, छापासत्र सुरू आहे आणि काही जणांची कोठडीत रवानगी पाहता आता राज्यकर्ते असलेली तीन पक्षाची महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपत आरपारची लढाईच सुरू झाल्याचे दिसते.

- Advertisement -

आता भाजपकडून अब नही तो कभी नही, ठाकरे सरकारचे काऊंटडाऊन सुरू, अशा प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. सुरुवातीला ईडीनंतर आयकर खाते सीबीआयने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांना जेरीस आणल्यानंतर कार्डेलिया क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात पहिल्यांदाच सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या नाकी नऊ आणले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दररोज सकाळी मॅरेथॉन पत्रकार परिषदा घेऊन एनसीबीच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारे दररोज नवनवीन पुरावे आणून मलिक यांनी भाजपच्या नेत्यांना जेरीस आणले आहे. ड्रग्स पेडलर्स आणि भाजपच्या नेत्यांचा संबंध काय, असा सवाल करीत मलिक यांनी पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल संशय मात्र निर्माण केला. मलिक यांनी थेट फडणवीस यांच्यावरच ड्रग्स प्रकरणासंबंधी आरोप केल्याने फडणवीस यांनीही मलिक यांच्यावर पलटवार केला. पण पहिल्यांदाच फडणवीस यांनी मागील दोन वर्षात दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, अशी डरकाळी फोडल्याने आता राजकीय युद्ध नाही तर महायुद्ध सुरू झाल्याची चुणुक मागील 48 तासांपासून दिसत आहे.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांविरोधात आरोपांचे फटाके फोडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यावर सूचक वक्तव्य केलं. राजकीय फटाक्यांसाठी दिवाळीची आवश्यकता नसते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याने शिवसेनाही भाजपच्या फुसक्या धमक्यांना भीक घालणार नाही हे आता स्पष्ट झालंय. काही लोक दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असं म्हणतायत, फटाके जरुर फोडा पण धूर काढू नका. ते पाकिस्तानवर बॉम्ब कधी टाकतात त्याची आपण वाट पाहतोय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावत एकाचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावल्याने भाजपही बुचकळ्यात पडले आहे.

- Advertisement -

राज्यातील राजकारण सध्या तापलेले आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. नवाब मलिक दररोज नवनवीन आरोप करत आहेत. अशा वेळी दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले होते. सध्या दिवाळी असून शिमग्याला अजून सहा महिन्यांचा काळ आहे. मात्र, राजकीय धुळवड ऐन दिवाळीतच सुरू झाल्याने दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते जोमात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलाच पक्ष बरोबर कसा, आपलाच नेता योग्य कसा हे सांगण्यात वरचढ दिसत आहे.

आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत भाजपकडून मागील दोन वर्षात महाविकास आघाडी सरकार पडण्याचे अनेक मुहूर्त देण्यात आले. मात्र, एकाही मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार गडगडले नाही. सरकार पाडण्यासाठी भाजपने साम, दाम, दंड, भेद या चतू:सुत्रीचा वापर केला. मात्र, त्यांना अपेक्षित असे फळ मिळाले नाही. त्यामुळेच कधी सीबीआय, कधी ईडी, कधी आयकर खात्याच्या धाडी तर बेनामी संपत्तीच्या नोटिसा पाठवून महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यत्वे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या डझनभर नेत्यांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने केलेली अटक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर पडलेल्या आयकर खात्याच्या धाडींमुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आला आहे.

भाजपच्या किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील, नारायण राणे यांनी आतापर्यंत सरकार पडण्याचे डझनवार मुहूर्त दिले, पण सरकार काही पडले नाही. पण आता दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, अशी राणाभीमदेवी थाटात घोषणा केल्याने मी पुन्हा येणार… हा त्यांचा दृढनिश्चय पूर्ण होणार की पुन्हा त्यांना तीन वर्षे वाट पहावी लागणार हे काही दिवसांत कळेल. कारण येत्या 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकारची दोन वर्षे पूर्ण करतील. आतापर्यंत फडणवीस यांनी जाहीर बोलताना आम्हाला सरकार पाडण्यात स्वारस्य नाही. आपापसातील हेवेदाव्यांमुळे ते आपोआपच गडगडेल. आम्ही पाडणार नाही, अशी भूमिका घेणारे फडणवीस आता मात्र सरकार पाडण्यासाठीचा बॉम्ब दिवाळीनंतर फोडू, असे चॅलेंज राज्य सरकारला देत आहेत.

फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि मोदींच्या करिष्म्यावर विश्वास ठेवून इतर पक्षातून भाजपात आलेल्या सुमारे 114 जणांना पुन्हा भाजपचे सरकार यावे असे मनोमन वाटते. त्यात पुन्हा मागील दोन वर्षात झालेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांची आकडेवारी भाजपपेक्षा जास्त असल्याने भविष्यात तीन पक्षांचा फॉर्म्युला एकत्रित राहिला तर भाजप सत्तेत कधीच येऊ शकत नाही, अशी खूणगाठ भाजपच्या आयात नेत्यांनी मनोमन बांधून ठेवली आहे. भाजपमध्ये सत्ता नसल्याने अस्वस्थता जास्त आाहे. त्यामुळेच कधीही न बोलणारे अ‍ॅड. आशिष शेलार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या हो ला हो करीत दिवाळीनंतर राज्यात धमाका होईल, असे अप्रत्यक्षरित्या सांगत आहेत.

दिवाळी आधी लवंगी फोडून मोठा आवाज करण्याचा नवाब मलिकांचा प्रयत्न आहे. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत, त्यांनी माझ्याशी बोलू नये. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो ट्विट केला. दिवाळी झाल्यानंतर मी बॉम्ब फो़डेन, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांना इशारा दिला आहे. माझ्या जावयाकडे गांजा सापडला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आरोप लावले. किसी माय के लाल मे हिंमत नही है मेरे तरफ उंगली उठाने की के मेरे अंडरवर्ल्ड से संबंध हैं, असे खणखणीत प्रत्युत्तर नवाब मलिकांनी देत, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असे ट्विट करीत भाजपलाही इशारा दिला आहे. नवाब मलिक हे राज्याचे कौशल्य विकास मंत्री आहेत. त्यांच्या अंगी असलेली कौशल्ये ते रोजच्या रोज ट्विट करून दाखवतात. यापूर्वी दररोज पत्रकार परिषदा घेण्याचा सपाटा शिवसेना नेते संजय राऊत, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावला होता. मात्र, मलिक या दोघांना भारी पडल्याचे सध्या दिसत असून, यापूर्वी भाजप प्रसार माध्यमांचा डे प्लॅन ठरवित होते. मात्र, मागील तीन आठवड्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हे पत्रकारांना खाऊ देत असतात.

राजकारणानं आता इतकी खालची पातळी गाठली आहे की त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी नागरिकांवर आली आहे. आधीच कोरोनाने लोकांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि या दिवाळीला राज्यातील नागरिक 20 महिन्यांनंतर मोकळा श्वास घेणार आहेत. राजकारण हा बदमाशांचा अड्डा असतो, या प्रसिद्ध विधानाची प्रचिती यावी, अशा प्रकारचे वर्तन सध्या राज्यात दोन्ही बाजूंनी सुरू आहे. राजकारणात विरोधी पक्ष आरोप करतात आणि सत्ताधार्‍यांना उत्तरे द्यावी लागतात. अनेकदा आरोप करणार्‍यांचा तोल जातो; कारण ते सत्तेतील पदांवर नसतात. त्यामुळे त्यांना गमावण्यासारखे काही नसते. त्याउलट सत्ताधार्‍यांना जास्त जबाबदारीने बोलावे-वागावे लागते. पण सध्या सत्ताधारीच उघड धमक्या देत असल्याने विरोधी पक्षाला आयते कोलित मिळाले आहे. कारण अब नही तो कभी नही, अशी धारणा टीम देवेंद्रची झाल्याने आता राज्यात सत्तांतर करावेच लागेल. नाहीतर तीन वर्षे वाट बघण्याशिवाय पर्याय नाही, अशीच ‘मन की बात’ भाजपच्या फडणवीस समर्थकांची झाली आहे. आतापर्यंत थेट फडणवीस यांच्यावर किंवा त्यांच्या निकटवर्तीयांवर राजकीय हल्ला झाला नव्हता.

त्यामुळे पत्नी अमृता आणि स्वत:वरील हल्ल्यानंतर फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याची भाषा केली आहे. सर्वात मोठा पक्ष, 105 आमदार असलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसण्याची सल अधिक फडणवीस यांना आहे. यापूर्वी त्यांनी एकदा दीड दिवसाचे सरकार राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबत स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे आता जर का महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बॉम्ब फोडायचा असेल तर फडणवीस यांना सर्वांना विश्वासात घ्यावे लागेल. अन्यथा पुन्हा एकदा फजिती झाली तर फडणवीस यांची रवानगी थेट केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यावाचून पर्याय भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे नसेल. त्यामुळे फडणवीस समर्थक, मूळ भाजपनिष्ठ आता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकवटण्याच्या तयारीत असून केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे, धाडसत्र सुरू असतानाच असंतुष्ट आमदारांना गळाशी लावण्याचा शेवटचा प्रयत्न भाजप करण्याच्या मन:स्थितीत आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत राजकीय फटाके फुटतात की फडणवीसांचा इशारा ‘बोलाचा भात, बोलाची कढी’ ठरतो, हे कळण्यासाठी महिनाअखेरपर्यंत वाट पहावी लागेल.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -