Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रNCP : घड्याळाबाबत निवेदन प्रसिद्ध; अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टाचे आदेश ऐकले

NCP : घड्याळाबाबत निवेदन प्रसिद्ध; अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टाचे आदेश ऐकले

Subscribe

सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाबाबत निवेदन प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ऐकले असून, यासंदर्भातील पहिले निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना दिले आहे. ज्यामुळे आता अजित पवारांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी असल्याचे बोलले जाते. पण या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. यानंतर याबाबतचा निर्णय देत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाबाबत निवेदन प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ऐकले असून, यासंदर्भातील पहिले निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. (As per Supreme Court order, Ajit Pawar NCP released statement regarding clock symbol)

हेही वाचा… Vijay Shivtare : शरद पवारांमुळे ग्रामीण भागात दहशतवादाचा उगम, शिवतारेंचा गंभीर आरोप

“भारत निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला “घड्याळ” चिन्ह दिले आहे. हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. अंतिम निकालाच्या अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे,” असे या निवदेनाच्या माध्यमातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. अशा प्रकारची माहिती देणारे निवेदन राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील दैनिकातून प्रसिद्ध करावे असे आदेश दिले होते. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दैनिक लोकसत्तामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन छापून आले आहे.

निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर त्यावर आक्षेप घेत शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अजित पवारांना दिलेले चिन्ह गोठवावे अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह दिल्यास ग्रामीण भागातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुर्तास अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह देऊ नये अशीही मागणी करण्यात आली होती. शरद पवार गटाची ही मागणी न्यायालयाने फेटाळली. परंतु या खटल्यामध्ये अंतिम निकालानुसार बदल होऊ शकतो, त्यामुळे भविष्यात अजित पवार गटाकडेच घड्याळ हे चिन्ह राहू शकेल याची शाश्वती नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे अशा पद्धतीचे निवेदन प्रसिद्ध करावे, असे आदेश दिल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) अशा प्रकारचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.