घरमहाराष्ट्रनारायण राणेंना काँग्रेसमध्ये घेण्यास अशोक चव्हाणांचा विरोध!

नारायण राणेंना काँग्रेसमध्ये घेण्यास अशोक चव्हाणांचा विरोध!

Subscribe

नारायण राणे आता काँग्रेसच्या मर्गाला आहेत, अशी शक्यता वर्तवली जात होती. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राणे काँग्रेसकडे पुन्हा परततील, असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राणेंना काँग्रेसमध्ये पुन्हा घेण्यास तीव्र विरोध आहे.

नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि गेल्यावर्षी राज्याच्या राजकारातील एक महत्वपूर्ण असे नाव. मात्र, गेल्या काही वर्षांत नारायण राणे यांचे राजकीय ग्रह फिरले की काय असेच जणू काही चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसला जय महाराष्ट्र करून नारायण राणे यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. एवढेच नाही तर भाजपच्या गोटातून ते राज्यसभेवर देखील गेलेत. मात्र, अवघ्या काही महिन्यातच नारायण राणे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. त्यांनी आपली ही अस्वस्थता काँग्रेसमधील काही आपल्या जवळच्या व्यक्तींकडे बोलून देखील दाखवली. राणेंची हीच भाजपामध्ये होणारी खदखद अशोक चव्हाण यांच्यापर्यत पोहोचली. राणेंना जरी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा असली, तरी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मात्र राणेंना काँग्रेसमध्ये पुन्हा घेण्यास तीव्र विरोध असल्याची माहिती आपलं महानगरला विश्वसनिय सूत्राकडून मिळाली.

म्हणून काँग्रेसमध्ये राणे पुन्हा नकोत

नारायण राणे हे आक्रमक नेते आहेत. तसेच ते कधी कुणावर टीका करतील हे सांगता येत नाही. याआधी काँग्रेसमध्ये असताना नारायण राणे यांनी सोनिया गांधी यांच्यावर देखील उघडपणे टीका केली होती. एवढेच नाही तर नारायण राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर देखील टीका केली होती. त्यातच नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांनी तर वारंवार अशोक चव्हाण यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून असो किंवा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून असो, अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे पून्हा राणे ही नसती ब्याद अंगावर नको अशीच काहीशी भूमिका अशोक चव्हाण यांची असल्याने जरी काँग्रेसच्या इतर नेत्यांना राणे काँग्रेसमध्ये यावे असे वाटत असले तरी अशोक चव्हाण यांचा मात्र त्याला तीव्र विरोध असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

थोरतांना मात्र राणे काँग्रेसमध्ये हवेत

अशोक चव्हाण यांचा जरी राणेंना विरोध असला तरी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून मात्र राणेंना कॉंग्रेसमध्ये घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच की काय नुकतीच त्यांनी राणे पून्हा काँग्रेसमध्ये परततील असा विश्वास व्यक्त केलाय.

काय म्हणालेत थोरात?

नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परततील, तसेच काँग्रेस सोडून गेलेले अनेक नेते आज परतीच्या वाटेवर आहेत. एवढंच नाही तर पुढील निवडणुकीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री काँग्रेसचेच दिसतील, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान यावर अशोक चव्हाण यांना विचारले असता नारायण राणे काँग्रेसमध्ये येत आहेत अशी कुठलीही चर्चा नाही. बाळासाहेब थोरात यांनी नारायण राणे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही, असे सांगत अधिक बोलणे टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -