घरमहाराष्ट्रमराठीच्या अस्मितेसाठी समाज माध्यमांवर अस्मिताची धडपड

मराठीच्या अस्मितेसाठी समाज माध्यमांवर अस्मिताची धडपड

Subscribe

मराठी शुद्धलेखनाचा अभिनव उपक्रम सुरु

सध्या समाज माध्यमांवर अनेक कविता लेख, रचना पाहायला मिळतात, पण व्याकरणाच्या चुका फार असतात. त्याकडे आजची तरुण पिढी सर्रास दुर्लक्ष करत आहे. मराठी भाषा योग्य रुपात लिहिली तर ती पुढील पीढी पर्यंत योग्य रुपात पोहोचेल. याकरिता लॉकडाऊन काळात मराठी भाषेची अस्मिता टिकविण्यासाठी अस्मिता येंडे या तरुणीने समाज माध्यमांवर मराठी शुद्धलेखनाचा उपक्रम सुरु केला आहे. तिच्या या उपक्रमाला समाज माध्यमांवर तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. अस्मिताने हा उपक्रम सुरु करून मराठी भाषेचे अभ्यासक अरुण फडके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जागतिकीकरणामुळे इंग्रजीसारख्या जागतिक भाषेचे महत्त्व वाढत असताना मातृभाषा मागे पडत आहे. आता तर सोशल मीडियावर सुरुवातीला फक्त इंग्रजी भाषेचा वापर केला जात होता. मात्र, आता मराठीचा वापर करण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. सोशल मीडिया अस्तित्वात आल्यानंतर इंग्रजी ही एकमात्र लिपी संवाद माध्यम होतं. सगळे संदेश हे इंग्रजीतूनच एकमेकांना पाठवले जात होते. पण आता काळ बदललाय. आता आपल्या मातृभाषेत संदेश पाठवण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे रोज कोणत्या ना कोणत्या ग्रुप वर ऑनलाइन काव्य स्पर्धा घेतल्या जातात. पण आजही पारितोषिक आणि पुरस्कार यात गल्लत होताना दिसून येते. तसेच समाज माध्यमांवर मराठी लिहिणाऱ्या पोस्टमध्ये शब्दांच्या चुका होताना दिसत आहेत. शुद्धलेखनाचं महत्त्व कमी होत चाललं आहे. तसंच शुद्धलेखन ठेवा खिशात या छोट्या पुस्तिकेद्वारे शुद्ध मराठी भाषा घराघरात पोहोचवणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचं गेल्या महिन्यात निधन झालं. त्यामुळे मराठी भाषा प्रेमी व तरुण लेखिका अस्मिता येंडे हिने अरुण फडके यांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी समाज माध्यमांवर मराठी शुद्धलेखनाचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.

- Advertisement -

काय आहे उपक्रम?

दैनिक आपलं महानगरशी बोलताना अस्मिताने सांगितलं की, मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांच्या ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ या पुस्तकाचा वापर मी मुद्रितशोधन करताना वापरते. या पुस्तकामुळे मला बरीच माहिती मिळाली. त्यामुळे ती माहिती, मराठी शुद्धलेखनाचे नियम, शब्दांचे रूप हे मी माझ्या फेसबुक अकाउंट आणि इतर माध्यमावर रोज माहिती स्वरुपात शेयर करते आहे. अनेक नवोदित लेखक, कवी यांच्याकडून खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे मराठी शुद्धलेखनावर चर्चा ही होत आहे आणि आपल्याकडील ज्ञानाची देवाण-घेवाण ही करत आहेत. काहीजण वैयक्तिकरित्या मला विशिष्ट शब्दाबाबत विचारणा करतात.

“सोशल मिडियावर मराठी भाषा ज्या पद्धतीने लिहिली जात आहे. ते पाहुन खरं तर वाईट वाटलं. आपण काय करू शकतो? हा विचार करत असताना मला मराठी शुद्धलेखन उपक्रम सुरु करावा असं वाटलं. म्हणून मी हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला छान प्रतिक्रिया मिळत आहेत. मराठी भाषा फक्त बोलणे गरजेचे नाही. तर ती योग्य रुपात लिहिणं ही महत्वाचं आहे, हेच मला या उपक्रमातून सांगायचं आहे. या उपक्रमातून मराठी भाषाभ्यासक अरुण फडके यांना श्रद्धांजली वाहायची आहे.”

- Advertisement -

अस्मिता येंडे, भाषा प्रेमी व तरुण लेखिका

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -