घरताज्या घडामोडीपाईपलाईनच्या उघड्या चेंबरमध्ये पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू!

पाईपलाईनच्या उघड्या चेंबरमध्ये पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू!

Subscribe

मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीतील येवई (पांजरापोळ) येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पाईपलाईनवरील उघड्या चेंबरमध्ये पडून गस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे.शिवराम बुधाजी भोईर असे उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नांव आहे. या घटनेने पालिका वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते पुंडास ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच शर्मिला भोईर यांचे पती होते. ते गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ मुंबई महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. काल रात्री रात्रपाळीची ड्युटी असल्याने ते आपले कर्तव्य बजावत होते. पांजरापोळ येथून जवळच्या टेकडीवर असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनची पाहणी करण्यासाठी ते गस्त करीत असताना रात्रीच्या अंधारात त्यांचा पाय घसरून ते पाच फूट खोल असलेल्या उघड्या चेंबरमध्ये पडले.त्यावेळी त्यांच्या डोक्याला जबरी मार लागून गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे.

हि घटना त्यांचे सहकारी सुरक्षा रक्षक सचिन महाजन व संजय कारभल हे काल दुपारी ३ वाजता ड्युटीवर आले असता त्यांना मृत शिवराम भोईर यांची दुचाकी पाण्याच्या टाकीजवळ दिसून आली मात्र भोईर कोठे दिसत नाहीत म्हणून त्यांनी अन्य कर्मचाऱ्यांच्या साथीने त्यांचा शोध घेतला असता शिवराम भोईर हे पाईपलाईनच्या उघड्या चेंबरमध्ये मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले.या घटनेची तात्काळ माहिती कुटुंबियांना व तालुका पोलिसांना दिली असता पोलिस उपनिरीक्षक श्रेयन राठोड यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून पुढील सोपस्कार पार पाडण्यात आले.या घटनेची नोंद तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.मात्र मृत शिवराम भोईर यांचा घातपाताने मृत्यू झाला आहे किंवा कसे ? या दृष्टीने देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करा’, पोलिसांच्या मागणीवर पालिकेचे अधिकारी म्हणतात…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -