अनिल जयसिंघानीच्या चौकशीतून मोठा खुलासा, ‘इतक्या’ कोटींच्या मॅच फिक्सींगचं रॅकेट उघड

anil jaisinghani

बुकी अनिल जयसिंघानीच्या चौकशीतून एक मोठा खुलासा समोर आला आहे. तो म्हणजे १५०० कोटींचं मॅच फिक्सींगचं रॅकेट उघड झालं आहे. या प्रकरणी अनिल जयसिंघानी आणि फरार असलेला बुकी रमेश यांच्यातील फोनवरील संभाषण समोर आलं आहे. तसेच यामध्ये क्रिकेटपटू आणि पोलिसांचाही समावेश असल्याचं उघडकीस आलं आहे.

अनिल जयसिंघानीला मुंबईच्या गुन्हे शाखेने २० मार्चला गुजरातमधून अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने जयसिंघानीला १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मात्र, त्याच्या चौकशीत एका ऑडिओ क्लिपमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यात अनिल जयसिंघानी रमेश नावाच्या एका बुकीसोबत असल्याचे दिसत आहे. रमेश भाई मी सनी बोलत आहे, आपलं अगोदर बोलणं झालं होतं. तुम्हाला मुंबईत जागा हवी आहे का?, माझं ठाण्यात आणि शिर्डीमध्ये स्वत:चं हॉटेल आहे. एकदम सुरक्षित आहे, अशा प्रकारची ऑडिओ क्लिप जयसिंघानी बोलत असल्याचे समोर आले आहे. मात्र, या रॅकेटमध्ये पोलिसांचा देखील समावेश आहे.

मागील अनेक महिन्यांपासून अनिल जयसिंघानी फरार होता. अमृता फडणवीस यांना लाच देण्याच्या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला गुजरातमधून ताब्यात घेतले. आता या प्रकरणी आणखीन नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनिक्षा हिच्यावर अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग आणि लाच दिल्याचा आरोप असून अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून तिला १६ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात जयसिंगानीला मुंबई सत्र न्यायालयाने ५० हजारांचा जामीन मंजूर केला आहे. गेल्या सुनावणीत अनिक्षाला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी सुनावल्यानंतर लगेच जयसिंघानी यांनी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता.

कोण आहे अनिक्षा जयसिंघानी?
अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिल जयसिंघानी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अनिक्षाने दावा केला की, ती कपडे, दागिने आणि शूज डिझाइन करते. अनिक्षाने उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिच्या डिझाईन केलेल्या अॅक्सेसरीज घालण्याची, तिच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी आणि विक्रीत मदत करण्याची विनंती केली होती.


हेही वाचा : दाराला कुलूप अन् पोलिसांची नोटीस; जामीन मंजूर झाल्यानंतर अनिक्षा जयसिंघानी गायब