घरमहाराष्ट्रBJP : गुजरातचा विकास म्हणजे देशाचा विकास..., ठाकरे गटाची फडणवीसांवर घणाघाती टीका

BJP : गुजरातचा विकास म्हणजे देशाचा विकास…, ठाकरे गटाची फडणवीसांवर घणाघाती टीका

Subscribe

मुंबई : परकीय गुंतवणुकीबाबत आकड्याचा ‘भुलभुलैया’ तुम्हाला करायचाच असेल तर ती तुमची मर्जी. परकीय गुंतवणुकीचा सातबारा फक्त आमच्याच नावावर ही कुऱ्हाड स्वतःच स्वतःच्या पायावर मारून घ्यायची असेल तर, तीदेखील तुमची मर्जी. महाराष्ट्रातील जनता सगळे ओळखून आहे. बाकी महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीतच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात नंबर वन व्हायला हवा. फक्त ‘गुजरातचा विकास म्हणजे देशाचा विकास’ असे मानणाऱ्या तुमच्या श्रेष्ठींना ते मान्य होईल का, तेवढे बघा, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ‘त्या’ 23 जागांबाबत संजय राऊतांचा पुनरुच्चार; म्हणाले, काँग्रेसने तर…

- Advertisement -

मागील तीन वर्षांतील महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीचा सर्वात मोठा आकडा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा ‘आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक देशात नंबर वन झाली होss’ हे तुणतुणे तुम्ही कुठल्या तोंडाने वाजवीत आहात? मात्र माझे ते माझे आणि दुसऱ्याचे तेही माझे असा हडेलहप्पी कारभार राज्यात सुरू आहे, असल्याची टीकाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात केली आहे.

वास्तविक, त्या वेळी तर कोरोना महामारीमुळे एकूणच आर्थिक-औद्योगिक आणीबाणीची परिस्थिती होती. तरीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात (2021-22) राज्यात 15 हजार 439 दशलक्ष डॉलर्सची परकीय गुंतवणूक आली होती. मात्र तुमच्या काळात परकीय गुंतवणूक किती आली? तर 14 हजार 106 दशलक्ष डॉलर्स! तीदेखील कोरोना जाऊन एक वर्ष सरलेले असताना. म्हणजे तुमच्यापेक्षा महाविकास आघाडी सरकार राज्यातील परकीय गुंतवणुकीबाबत अव्वल होते. हे तुम्ही मान्य करीत नसला तरी तुम्हीच दिलेले आकडे त्यातील सत्य सांगत आहेत, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हा ‘नागपुरी कावा’ सध्या जरा जास्तच सुरू आहे, ठाकरे गटाचा Devendra Fadnavis यांच्यावर निशाणा

परकीय गुंतवणुकीबाबत तुम्हाला स्वतःची पोकळ छाती फुगवायचीच असेल तर खुशाल फुगवा, पण राज्यातील उद्योग क्षेत्र ‘मोडीत’ काढून येथील उद्योग गुजरातला पळवून नेणाऱ्या दिल्लीकरांच्या विरोधातही छाती पिटा! परकीय गुंतवणुकीच्या सोंगट्या फेकून तुम्हाला ना बनवाबनवीचा जुगार जिंकता येईल, ना महाविकास आघाडी सरकारचे श्रेय लाटता येईल, ना महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेण्यावरून तुमच्याबद्दल असलेला जनतेच्या मनातील रोष कमी होईल, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढली असेल तर कोणाला दुःख होणार आहे? महाराष्ट्र देशात अव्वल झाला असेल तर वाईट वाटण्याचे कारण काय? किंबहुना, फक्त परकीय गुंतवणुकीतच नव्हे तर, प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र देशात ‘नंबर वन’चे राज्य असावे असेच सगळ्यांना वाटते. प्रश्न इतकाच आहे की, ही गोष्ट आकड्यांच्या सोंगट्या फेकून साध्य कशी होईल? असा सवालही ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -