घरमहाराष्ट्रमुंबईत कोसळधार : घरांची पडझड; चार ठार, १५ जखमी

मुंबईत कोसळधार : घरांची पडझड; चार ठार, १५ जखमी

Subscribe

मालाडमध्ये दोन मजली घर जमीनदोस्त, फोर्टमध्ये भानुशाली इमारतीचा भाग कोसळला

मुंबईत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे घरांच्या पडझडीच्या दोन दुर्घटना गुरुवारी समोर आल्या आहेत. मालाड मालवणी येथे नुरी मशीद जवळ सकाळी तळमजला अधिक दुमजली घर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन जण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत १३ जण जखमी झाले आहेत. तर फोर्ट येथे जीपीओ समोरील कबुतरखान्याजवळ म्हाडाची सेस इमारत असलेल्या भानुशाली इमारतीचा काही भाग संध्याकाळी कोसळला. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेत दोन ठार तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

गुरुवारी दुपारी २ वाजून ३८ मिनिटांनी मालाड मालवणी येथे नुरी मशीदजवळील गेट नंबर-५ जवळ तळमजला अधिक दुमजली घर कोसळले. त्यामुळे या परिसरात एकच घबराट पसरली. पाऊस सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. त्यामुळे स्थानिकांना मदतकार्य करण्यात अडथळा येत होता. काही वेळाने अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात सुरुवात केली. पोलीस आणि अग्निशमन दलाने ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन ढिगार्‍याखालून १५ जणांना बाहेर काढले.

- Advertisement -

या १५ जणांना तातडीने मालाड येथील हयात रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच फैजल वाहिद सय्यद या व्यक्तीचा आणि अंजूम शहाबुद्दीन शेख या महिलेचा मृत्यू झाला. तर इतर १३ जणांना किरकोळ मार लागल्याने त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी फायर इंजिन, रेस्क्यू व्हॅन आणि जेसीबी मशीनच्या सहाय्याने हा संपूर्ण ढिगारा उपसला आहे. या दुर्घटनेत आजूबाजूच्या घरांनाही तडा गेल्याचे सांगण्यात येते.

फोर्टमध्ये इमारतीचा भाग कोसळला

या दुर्घटनेनंतर संध्याकाळी ४ वाजून ४३ मिनिटांनी जीपीओ समोरील कबूतरखानाच्या बाजूला असलेल्या भानुशाली इमारतीचा ४० टक्के भाग कोसळला. इमारत कोसळल्याचे कळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले. या इमारतीच्या ढिगार्‍याखाली १८ जण अडकले होते. त्यापैकी २ जण मृत्युमुखी पडले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जे. जे. हॉस्पिटलमध्ये इलाज सुरू आहेत. तर १६ जणांना ढिगार्‍याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. इमारतीचा भाग कोसळल्याचे कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. ठाकरे यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर आणि महानगरपालिकेचे अधिकारीही उपस्थित होते.

- Advertisement -

मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा

या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या दुर्घटनेला इमारतीचा मालक दोषी असल्याची प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. धोकादायक इमारतींकडे महापालिका दुर्लक्ष करत नाही. मात्र, आम्ही लोकांना खेचून घरातून बाहेर काढू शकत नाहीत. त्यामुळे मालकांची किंवा प्राधिकरणाची ती जबाबदारी असते. त्यामुळे जे चालढकल करतात अशा मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, असे मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -