विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी निवडणूक मोदीच जिंकतील, चंद्रकांत पाटलांचे विधान

chandrakant patil said Modi will win the elections No matter how many fronts the opposition forms
विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी निवडणूक मोदीच जिंकतील, चंद्रकांत पाटलांचे विधान

यूपीएची कमान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी निवडणूक मोदीच जिंकतील अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा विरोधी पक्षांचा प्रश्न आहे. परंतु भाजपाविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच जिंकेल, असा आत्मविश्वास सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

विरोधकांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न

यूपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवावे, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याविषयी प्रश्न केला असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपाविरोधी पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आपण काही बोलणार नाही. तथापि, भारतीय जनता पार्टी बूथपातळीपर्यंत भक्कम संघटनात्मक बांधणी करत आहे. त्याच्या जोरावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचवू. मोदींची लोकप्रियता, त्यांच्या सरकारचे काम आणि भाजपाची संघटनात्मक शक्ती यामुळे आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जिंकतील असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

केवळ सत्तेसाठी राज्यातील महाविकास आघाडी

त्यांनी सांगितले की, केवळ सत्तेसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे घटकपक्ष एकत्र राहिले असले तरी त्यांच्यातील विसंवाद सतत समोर येत आहे. काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या पंचवीस आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निधी वाटपातील अन्यायाबद्दल पत्र लिहिले. प्रशासनाची वाताहत झाली आहे. अधिकारी दबावाखाली आहेत. त्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी तात्पुरत्या नेमणुकीवर केंद्र सरकारमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहेत तर काहीजण शिष्यवृत्ती मिळवून प्रशिक्षणासाठी परदेशी जाण्याच्या धडपडीत आहेत. या सगळ्यात जनतेचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. एसटीचा संप, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा समस्या सोडविल्या जात नाहीत.


हेही वाचा : गुढीपाडव्यापूर्वी निर्बंध शिथिल करण्याच्या हालचालींना वेग, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे वक्तव्य