घरताज्या घडामोडीCongress Vs VBA : काँग्रेसची दहावी यादी; अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात यांना दिली...

Congress Vs VBA : काँग्रेसची दहावी यादी; अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात यांना दिली उमेदवारी

Subscribe

मुंबई – काँग्रेसची लोकसभेसाठीची दहावी यादी प्रसिद्ध झाली आहे. दोन उमेदवारांचा समावेश असलेल्या या यादीत महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांविरोधात महाविकास आघाडीने अखेर उमेदवाराची घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवर विना अट पाठिंब्याची घोषणा केली आहे. त्यापैकी दोन मतदारसंघात पाठिंबा जाहीरही केला आहे. त्यानंतरही काँग्रसकडून प्रकाश आंबेडकरांविरोधात अकोल्यात उमेदवाराची घोषणा झाली आहे.

- Advertisement -

अकोल्यात तिरंगी लढत 

अकोल लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाने येथे अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने पहिल्या यादीतच अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीची घोषणा केली. काँग्रेस येथून उमेदवार देणार की नाही, याबद्दल तर्कवितर्क लावले जात असतानाच काँग्रेसने दहावी यादी प्रसिद्ध करत दोन उमेदवारांची घोषणा केली. त्या दोन पैकी एक उमेदवार हे महाराष्ट्रातील अकोल मतदारसंघातून आहेत. डॉ. अभय पाटील यांना काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्याविरोधात रिंगणात उतरवले आहे. भाजप, वंचित आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आता अकोल्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभय पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर
अकोला लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभय पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर

कोण आहेत डॉ. अभय पाटील

अभय पाटील काँग्रेसचे पदाधिकारी असून पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत. अभय पाटील आणि त्यांची पत्नी डॉ. रेखा हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. डॉ. अभय पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच अकोला मतदारसंघात कामाला सुरुवात केली आहे. गावागावात जनसंपर्क अभियान त्यांच्याकडून राबवण्यात येत आहे. मतदारसंघात मतदार नोंदणी अभियानाचीही त्यांनी सुरुवात केली होती. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरही त्यांचा सक्रीय सहभाग जाणवत आहे.

- Advertisement -

वंचितचा काँग्रेसला सात मतदारसंघात पाठिंबा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून वंचित काँग्रेसला सात जागांवर विना अट पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या पत्राला खर्गेंकडून काय प्रतिसाद मिळाला याची माहिती त्यांनी नंतर दिली नसली तरी कोल्हापूर मध्ये छत्रपती शाहू महाराज आणि नागपूरमध्ये विकास ठाकरे यांना आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले.

नाना पटोलेंवरील वैयक्तिक आरोप भोवले?

गेल्या कित्येक निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यातून पराभव होत आला आहे. येथे काँग्रेस, भाजप आणि प्रकाश आंबेडकर अशीच लढत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत होते. काँग्रेस उमेदवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील मतविभागणीत भाजपचा विजय होत आला आहे. यंदा प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला विनाअट सात मतदारसंघात पाठिंब्याची घोषणा केली होती. त्याला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिसाद देत अकोल्यातून उमेदवार देणार नसल्याचे म्हटले होते. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून केलेले वैयक्तिक आरोप यामुळे काँग्रेस आणि वंचित यांच्यात मनोमिलन होऊ शकले नसल्याची चर्चा आहे. नाना पटोले हे येत्या चार एप्रिलला प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत.

काँग्रेसने अकोल्यात उमेदवार दिल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडी उर्वरीत पाच मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -