घरमहाराष्ट्रनाल्यात दूषित पाणी; मासे मृत

नाल्यात दूषित पाणी; मासे मृत

Subscribe

परिसरातील एमआयडीसीमधील जिते गावापासून वाहत येणारा टेमघर नाला गेल्या काही दिवसांपासून दूषित झाला असून, रासायनिक सांडपाणी मिसळत असल्याने पाण्यावर पांढर्‍या रंगाचा थर जमा झाला आहे. काही दिवसांपूर्वी या नाल्यातील माशांची पिले देखील मोठ्या प्रमाणावर मृत झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. औद्योगिक क्षेत्रातील सी, ई, बी, के झोनमधील नाल्यांमधून देखील हीच अवस्था दिसून येत आहे.

महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण हा विषय कायम चर्चेतील आहे. रासायनिक कंपन्यांमुळे परिसरातील नाले प्रदूषित झालेच, शिवाय ज्या ठिकाणी हे सांडपाणी खाडीत सोडले जाते त्या परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत देखील प्रदूषित झाले. यामुळे याठिकाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शिवाय महाड मॅन्युफॅक्चर असोसिअशनने प्रदूषणावर काम करण्यास सुरूवात केल्याने काही अंशी प्रदूषण थांबण्यास मदत झाली. मात्र अनेक छोटे-मोठे कारखाने नियम धाब्यावर बसवत नाल्यात पाणी सोडण्याचे काम करत आहेत.

- Advertisement -

टेमघर येथील नाला देखील काही दिवसांपासून प्रदूषित झाला असल्याचे दिसून येत आहे. नाल्यातील पाण्याला पांढरा रंग निर्माण झाला आहे. देशमुख कांबळे स्मशानभूमीजवळ असलेल्या या नाल्यावर पांढरा रंगाचा थर जमा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी टेमघर ते हायकल कंपनीपर्यंत साचलेल्या पाण्यात माशांची लहान पिले मृत झाल्याचे आढळून आले होते. हा नाला थेट सावित्री नदीला जाऊन मिळत आहे. ज्या ठिकाणी एमआयडीसी पिण्याकरिता पाणी घेते त्याच ठिकाणी हे पाणी येऊन मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. २०१८ मध्ये देखील हा नाला प्रदूषित झाल्यामुळे मासे मृत पावले होते. पुन्हा अशीच स्थिती झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र याकडे औद्योगिक प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. कंपन्यांना नोटिसा देणे या व्यतिरिक्त काम होत नसल्याने औद्योगिक क्षेत्रातील नाले पाऊस नसताना देखील पाण्याने भरलेले दिसून येत आहेत.

सी, ई, बी, के विभागातील गटारात आजदेखील रासायनिक सांडपाणी दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने देखील विश्रांती घेतली आहे. यामुळे छोटे नाले कोरडे पडले असले तरी औद्योगिक क्षेत्रातील नाले मात्र अद्याप पाण्याने भरलेले आहेत. या पाण्याला देखील विविध रंग आल्याने काही कंपन्या रसायनी सांडपाणी सोडत असल्याचे स्पष्ट होत आहे. सुदर्शन केमिकलच्या सुरक्षा भिंतीबाहेर वर्षभरापासून पाणी साचत आहे. अनेकवेळा पाण्याला पांढरा रंग देखील येतो. मात्र हे पाणी नेमके कुठे मुरते याचा पत्ता आजतागायत एमआयडीसी किंवा प्रदूषण मंडळाला लागलेला नाही.

- Advertisement -

महाड एमआयडीसीमधील सर्वच नाले दूषित झाले आहेत. प्रदूषण मंडळ पाणी कुठे मुरते याचा शोध न घेता केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
-तुकाराम देशमुख, अध्यक्ष, किसान क्रांती शेतकरी संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -