घरमहाराष्ट्रCyclone Tauktae : फळबागांचं मोठं नुकसान,पंचनामे करुन नियमानुसार मदत देणारच - अजित...

Cyclone Tauktae : फळबागांचं मोठं नुकसान,पंचनामे करुन नियमानुसार मदत देणारच – अजित पवार

Subscribe

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका अरबी समुद्राच्या किनारी असलेल्या जिल्ह्यांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फळबागांचं मोठं नुकसान झालं असून पंचनामे करुन नियमानुसार मदत देणार असल्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं.

तोक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे, पण गुजरात इथे जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. फळबागांचं नुकसान मोठं झालं असून त्यांचे पंचनामे करायला सांगितले आहेत. नियमानुसार मदत केली जाईलच पण अतिरिक्त मदत करण्याबाबत विचार करु, असं अजित पवार यांनी म्हटलं.

- Advertisement -

SDRF कडून मदत मिळते पण कधी मुख्यमंत्री आऊट ऑफ द वे जाऊन मदत करु शकतात. कोकणात वीज पुरवठा खंडित झाला आहे, तिथला वीज पुरवठा पूर्ववत करणं गरजेचं आहे. त्यानुसार लवकर काम करावं लागेल. बाहेरुन टीम पाठवून काम करावं लागेल. एका बोटींचे काही नाविक गायब आहेत त्याचाही तपास सुरु असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालय नियंत्रण कक्षातून आढावा

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात उपस्थित राहून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे असेही उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -