घरताज्या घडामोडी'उदयन राजेंकडे पुरावे मागणे, संजय राऊत यांचे चुकलेच' - अमोल मिटकरी

‘उदयन राजेंकडे पुरावे मागणे, संजय राऊत यांचे चुकलेच’ – अमोल मिटकरी

Subscribe

संजय राऊत यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची टीका.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे ज्याप्रमाणे निंदनीय होते, त्याप्रमाणेच उदयन राजेंकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागणेही तितकेच चुकीचे असून याबाबत संजय राऊत यांचे चुकलेच, अशी टीका राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष आणि गटनेते आशिष दामले यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या दादाज फिटनेस सेंटरचे उदघाटन आज अमोल मिटकरी आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी ही टीका केली.

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तक प्रकाशनानंतर राज्यात चांगलाच वाद पेटला होता. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वशंजांना याबाबत जाब विचारला होता. त्यानंतर लोकमत वृत्तपत्राला दिलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये राऊत यांनी छत्रपतींच्या वशंजांनी वशंज असल्याचे पुरावे द्यावेत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपकडून शिवसेना आणि राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. आता महाविकास आघाडीमध्ये असलेल्या मित्रपक्षातीलच एका नेत्याने संजय राऊत यांच्यावर टीका केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

अमोल मिटकरी यांनी ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या इतिहासावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. तान्हाजी चित्रपटात तानाजी मालुसरे यांचे नाव ‘तान्हाजी’ असे दाखवण्यात आले आहे. मात्र त्यांचे नाव तानाजी मालुसरा असे आहे. त्यांचे जन्मगावही उमरट नसून साताऱ्याजवळच्या पाचगणी येथील गोडवली असून पुढे ते आपल्या मामाच्या गावी उमरटला आले. मात्र चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला. याप्रसंगी माजी खासदार आनंद परांजपे, सुरज चव्हाण, सुहास खामकर आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -