घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis : महाराष्ट्राचे समाजकारण ही सलीम - जावेदची स्क्रिप्ट नाही; फडणवीसांनी...

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे समाजकारण ही सलीम – जावेदची स्क्रिप्ट नाही; फडणवीसांनी सुनावले

Subscribe

Devendra Fadnavis : शिवसेना उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच 'द इंडियन एक्सप्रेस' या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली. या मुलाखतीनंतर तर भाजपा आणि उद्धव गटात चांगलेच युद्ध रंगले आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे, आणि महाराष्ट्रातील राजकारणाला अधिकच वेग आला आहे. दररोज चढत्या क्रमाने आरोप – प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली. या मुलाखतीनंतर तर भाजपा आणि उद्धव गटात चांगलेच युद्ध रंगले आहे. (Devendra Fadnavis bjp hits back at uddhav thackerays over criticism)

देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असे उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत सांगितले. त्यातच शनिवार, २० एप्रिल रोजी दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना ‘कोडगा माणूस’ असे म्हटले. फडणवीसांवरील टीकेनंतर भाजपाने लागलीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट टाकून, हे महाराष्ट्राचे समाजकारण आहे, ही काही सलीम – जावेदची स्क्रिप्ट नाही, अशा स्क्रिप्ट करण्याच्या भानगडीत पडू नका, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा फडणवीसांनीच दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : मोदी-शहांनी कापले फडणवीसांचे पंख, संजय राऊतांचा दावा

देवेंद्र फडणवीस काय म्हणतात?

हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करीत राहू. पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करू शकत नाही.

- Advertisement -

हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते पाळायचे. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत. दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना? महाराष्ट्राचे समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रिप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका.

जशास तसे उत्तर दिले जाईल ! (Devendra Fadnavis bjp hits back at uddhav thackerays over criticism)

वाद कशामुळे पेटला?

सन 2019च्या निवडणुकीपूर्वी एका बंद खोलीत भाजपाचे दिग्गज नेते आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. पण निवडणूक निकालानंतर तो त्यांनी पाळला नसल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सरकार स्थापन केले. मात्र भाजपाने उद्धव ठाकरे यांचा हा आरोप फेटाळला.

‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबतचा शब्द पाळला नसल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन, असे वचन मी माझ्या वडिलांना दिले होते. त्यानुसार, प्रत्येकी 2.5 वर्षे शिवसेना आणि भाजपाचा मुख्यमंत्री असेल, याबद्दल अमित शहा यांच्यासमवेत सहमती झाली होती. शिवाय देवेंद्र फडणवीसही म्हणाले होते की, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवेन आणि मी स्वतः दिल्लीला जाईन. पण फडणवीस यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे ठरवले, असा दावा त्यांनी केला. (Devendra Fadnavis bjp hits back at uddhav thackerays over criticism)

हेही वाचा – Uddhav Thackeray : मोदी-शहांचा व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगावर ताशेरे

आरोपाला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

अमरावती येथील जाहीरसभेत या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी ठाकरे यांची घराणेशाही असल्याकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, आमचे जुने मित्र भ्रमिष्ट झाले आहेत, असे मला वाटते. बंद खोलीत अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असे ते आतापर्यंत सांगत होते. तर आता, मी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचा शब्द दिला होता, असे ते सांगत आहेत. त्यांना वेड लागले असावे. मी फक्त ट्रेनिंग देण्यासाठी आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा सल्ला दिला होता. त्यांना मुख्यमंत्री काय, मंत्री करण्याचाही विचार त्यावेळी नव्हता, असे ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी आधी ठरवावे की अमित शहा यांनी शब्द दिला की देवेंद्र फडणवीस यांनी! याचाच अर्थ, मी मुख्यमंत्री होईन किंवा माझा मुलगा मुख्यमंत्री होईल, असा केवळ आपल्या परिवाराचाच विचार केला, असा पलटवार त्यांनी केला आहे. त्यानंतर आता त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ‘जशास तसे उत्तर दिले जाईल’, असा इशारा देखील दिला आहे. (Devendra Fadnavis bjp hits back at uddhav thackerays over criticism)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -