घरमहाराष्ट्रगोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर भाजप अडचणीत, फडणवीसांनी पडळकरांना झापले

गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर भाजप अडचणीत, फडणवीसांनी पडळकरांना झापले

Subscribe

गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर भाजपवर टीका सुरु असतानाच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा भाजपवर टीका होऊ लागली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची भाजपच्या नेत्यांनी दखल घेतली असून, पक्ष अडचणीत येईल, अशी वक्तव्य यापुढे कुणीही करू नका असे भाजपकडून काही नेत्यांना सांगण्यात आले आहे. तसेच विरोध पक्षात आहोत पण आपण काय टीका करतो याचे भान देखील सर्वांनी ठेवायला हवे, असे भाजपच्या काही नेत्यांनी आपलं महानगर-माय महानगरशी बोलताना सांगितले. दरम्यान, ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे’, असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी दिल्यानंतर भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका होऊ लागली. पडळकर यांच्या या टीकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केली असून, पडळकर यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे होते. त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. ‘शरद पवार हे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाही. ज्येष्ठ नेत्यांबद्दल असे बोलणे चुकीचे आहे. पडळकर यांनी भावनेच्या भरात वक्तव्य केले असून, त्यांनी याबद्दल माफी मागितली आहे’, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांचे पोस्टर जाळत निषेध व्यक्त केला. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी १० वाजता पुण्यातील लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे आंदोलन करणार आहेत.

‘राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार यांच्यावर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला अशा उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाहीत, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!’

धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री

कोण गोपीचंद पडळकर? त्याची औकात काय? आपण काय बोलतो ते कळतं का? त्यांची उंची किती आणि ते बोलतात किती? सध्याच्या कोरोना संकट काळात पडळकरांनी महाराष्ट्रात फिरुन दाखवावे. शरद पवार यांच्यावरील टीका खपवून घेतली जाणार नाही. कॅमेऱ्यावर मी काही सांगणार नाही. पण याचे तीव्र पडसाद उमटतील. ते महाराष्ट्र पाहील.

जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -