घरमहाराष्ट्रदेखणं कुडपण, तेथे सुविधांची अडचण!

देखणं कुडपण, तेथे सुविधांची अडचण!

Subscribe

 पर्यटनस्थळाचा दर्जा मिळूनही उपेक्षा

तालुक्यातील कुडपण गावाला शासनाने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला खरा, परंतु घोषणांनंतर काही करायचे असते याचा शासनाला सोयिस्कररित्या विसर पडला असल्याने निसर्गाने भरभरून दिलेल्या कुडपणमध्ये सोयीसुविधांची अडचण कायम आहे. महाआघाडी सरकारच्या पर्यटन विभागाने या गावाकडे लक्ष दिल्यास दरवर्षी पर्यटकांची संख्या अनेक पटींनी वाढून स्थानिकांना विविध माध्यमांतून रोजगाराचे मोठे साधन उपलब्ध होऊ शकेल.

काखेत कळसा अन् गावाला वळसा, या म्हणीप्रमाणे मुंबई, पुण्यापासून काहीसे जवळचे ठिकाण असूनही, पर्यटक तुलनेत महागड्या आणि दूरच्या महाबळेश्वर किंवा अन्य ठिकाणी जातात. खरं तर कुडपणचा योग्य विकास नसल्याने तेथील अनेक देखणी ठिकाणे लुप्त झाल्यासारखी आहेत. निसर्गाच्या सानिध्यात रमणार्‍यांना कुडपण नेहमीच खुणावत असल्याने वर्षभरात शैक्षणिक सहलींसह ३ ते ४ हजार पर्यटक तेथे पोहोचतात. मुंबई-गोवा महामार्गावरील येथील एसटी बस स्थानकापासून कुडपण गाव २८ किलोमीटरवर आहे. तेथे जाताना क्षेत्रपाळ गाव सोडलं की दुतर्फा गच्च झाडीमधून जाणार्‍या घाटातून प्रवास सुरू असतो. निसर्ग सौंदर्य न्याहाळताना एक-दीड तासाचा प्रवास करून आपण कुडपणला केव्हा आलो हे समजत नाही.

- Advertisement -

६० ते ७० घरांची वस्ती असलेल्या या गावाला शिवकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अस्सल कोकणी धाटणीची सुबक आणि देखणी कौलारू घरे, त्यासमोर दगडी तुळशी वृंदावन, शेणाने सारवलेले अंगण आणि प्रत्येक अंगणात सुरेख रांगोळी यामुळे पर्यटक तेथे पोहचताच सुखावतात. गावात श्री भराडी देवीचे मंदिर आहे. गावाबाहेर दरीच्या बाजूला एक ८०० फूट उंच आणि ५०० फूट रूंद असा दगडी सुळका असून, तो पाहिल्यानंतर छातीत धस्स होते. याला भीमाची काठी असेही म्हणतात. सात वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांनी ही भीमाची काठी सर करून त्यावर झेंडा रोवला होता. पावसाळ्यात तेथील नजारा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. कुडपणच्या डोंगरात जगबुडी नदीचा उगम असून, तेथील पाणी थेट ८०० फूट खोलवर जाऊन थेट खेडमध्ये पोहचते.

समुद्र सपाटीपासून चार हजार मीटर उंच असलेल्या कुडपणचा निसर्ग न्याहाळण्यासाठी एक दिवस पुरत नाही. कौटुंबिक आणि शैक्षणिक सहलीसाठी हे उत्तम ठिकाण असल्याने पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी झाल्यानंतर त्याला तो दर्जा मिळालाही. परंतु प्रशस्त रस्ते आणि अन्य मूलभूत सोयीसुविधा तेथे झालेल्या नाहीत. या ठिकाणी येणारा पर्यटक पुन्हा आल्याशिवाय रहात नसल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. महाबळेश्वर, पांचगणी किंवा माथेरानकडे जाण्यापूर्वी पर्यटक कुडपणचाही विचार करतील असा विश्वासही ते ठामपणे सांगतात. कुडपणमधून पायवाटेने प्रतापगड किल्ल्यावर जाता येते. महावीरचक्र विजेते कॅप्टन कृष्णा सोनावणे यांचे हे गाव आहे. त्यांच्या घराचा जोता आजही तसाच ठेवण्यात आलेला आहे. आदरातिथ्यातही मागे नसणार्‍या कुडपण गावापर्यंत शासनाच्या सुविधा कधी पोहचणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

- Advertisement -

राजकारणाचा फटका..
स्थानिक राजकारणातील हेवेदावे आणि ‘तुझे-माझे’ यात पर्यटन स्थळांकडे दुर्लक्ष केले जाते हा रायगड जिल्ह्यातील सार्वत्रिक अनुभव आहे. यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळात आदिती तटकरे यांच्या रूपाने पर्यटन खात्याचे राज्यमंत्री पद रायगडला मिळाले आहे. त्यामुळे लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शैक्षणिक सहली, पक्षीप्रेमी आणि अभ्यासक, गिरीप्रेमी, गिर्यारोहक आणि ट्रेकर्स यांची पावले या गावाकडे वळण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने पर्यटनाच्या हष्टीने गावात सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या तर ग्रामस्थांसह अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
-हनुमान शेलार, सरपंच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -