घरमहाराष्ट्रना शिवाजी पार्क, ना बीकेसी; शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को संकुलात?

ना शिवाजी पार्क, ना बीकेसी; शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को संकुलात?

Subscribe

मुंबई : दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदाना (शिवाजी पार्क)वर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या अर्जावर निर्णय घेण्यास मुंबई महापालिकेकडून निव्वळ वेळकाढूपणा सुरू आहे. तर दुसरीकडे एमएमआरडीएने वांद्रे-कुर्ला संकुला (बीकेसी)तील मैदान शिंदे गटासाठी आरक्षित करत शिवसेनेचा अर्ज फेटाळल्याने शिवसेनेची पुरती कोंडी झाली आहे. दसर्‍याला जेमतेम 15 दिवस शिल्लक असतानाही मैदान मिळत नसल्याने पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

महापालिकेकडून दोन्ही गटांना सभेसाठी परवानगी नाकारण्याचीच शक्यता अधिक आहे. तसे झाल्यास शिंदे गटाकडे बीकेसीतील एमएमआरडीच्या मैदानाचा तरी पर्याय उपलब्ध आहे. परंतु शिवसेना दसरा मेळावा कुठे घेणार? याची चिंता सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनाही सतावू लागली आहे. अशा स्थितीत सायन येथील सोमय्या आणि गोरेगावातील नेस्को संकुलाचा पर्याय शिवसेनेसमोर उरत आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे नेते अ‍ॅड.अनिल परब यांनी 22 ऑगस्ट रोजी, तर शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी 30 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या जी-उत्तर विभागाकडे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. परंतु दसरा मेळाव्याचे प्रकरण तापल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता महापालिकेने विधि व न्याय विभागाकडून अहवाल मागितला आहे. या अहवालानंतरच महापालिका काय तो निर्णय घेईल. दरम्यान, शिंदे गटाने केलेल्या अर्जावर निर्णय घेत एमएमआरडीएने बीकेसीतील मैदान शिंदे गटासाठी आरक्षित केले आहे. पहिल्या अर्जाला पहिले प्राधान्य हाच निकष असेल, तर आम्हाला शिवाजी पार्क मिळालेच पाहिजे, ही भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली आहे. एवढेच काय तर, महापालिकेने परवानगी नाकारल्यास शिवसेनेने न्यायालयात जाण्याचीही तयार ठेवली आहे. परंतु दसरा मेळावा कुठे घेणार हा प्रश्न उरतोच. बीकेसी वगळता सायन येथील सोमय्या मैदान आणि गोरेगावातील नेस्को संकुल हे दोन ठिकाणे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी योग्य ठरू शकतात. या दोन ठिकाणांपैकी सोमय्या मैदान हे आकाराने लहान असून नेस्को संकुलाची जागा त्या तुलनेत मोठी आहे. त्यामुळे शिवसेनेकडून नेस्को संकुलाची दसरा मेळाव्यासाठी निवड होऊ शकते.

नेस्कोसोबतचे जुने कनेक्शन
नेस्को संकुल हे शिवसेनेसाठी नवे नाही, शिवसेना पदाधिकारी, गटनेत्यांच्या बैठका नेस्को संकुलावर अधूनमधून होतच असतात. गिनीज बुकात नोंद झालेले शिवसेनेचे महा रक्तदान शिबीरही नेस्को संकुलातच आयोजित करण्यात आले होते. त्यातच 21 सप्टेंबरला मुंबईतील शिवसेना नेते, उपनेते, विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख आदी पदाधिकार्‍यांचा मेळावा नेस्को संकुलात होत असून या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला मुंबईतील सेनेचे 30 ते 35 हजार पुरुष व महिला पदाधिकारी सहभागी होणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

दसरा मेळाव्यासाठी फक्त शिवाजी पार्क, अशा हटवादी भूमिकेत सध्या शिवसेना नेते आहेत. परंतु महापालिकेने परवानगी नाकारल्यास ना शिवाजी पार्क, ना बीकेसीतील मैदान अशा कोंडीत शिवसेना अडकणार आहे. तेलही गेले, तूपही गेले, हाती उरले धोपाटणे, अशी अवस्था टाळण्यासाठी अखेर शिवसेनेला यंदाचा दसरा मेळावा नेस्को संकुलातच घेण्याचा कटू निर्णय घ्यावा लागेल, असा सर्वांचाच होरा आहे.

सत्ताधार्‍यांकडून अधिकार्‍यांवर दबाव!
शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा हे एक समीकरण आहे. कायदा -सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही रितसर परवानगी मागत आहोत. परंतु सत्तेचा माज दाखवून अधिकार्‍यांवर दबाव टाकून शिवसेनेची कोंडी केली जात आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा होऊ नये यासाठी कटकारस्थान करण्याचा प्रयत्न कोणाकडून सुरू आहे, हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. एमएमआरडीएच्या मैदानाची परवानगी शिंदे गटाला देण्यात आल्याचे समजले. आता शिवसेना पक्षप्रमुख जे ठरवतील त्याला शिवसैनिक पाठिंबा देतील, असे शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -