घरमहाराष्ट्रएकनाथ खडसेंकडून राष्ट्रवादी प्रवेशाचा इन्कार

एकनाथ खडसेंकडून राष्ट्रवादी प्रवेशाचा इन्कार

Subscribe

मुंबईत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होती. या बैठकीत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबद्दल खल करण्यात येत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, खुद्द एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा इन्कार केला असून तसा कोणताही निर्णय आपण घेतलेला नाही. तसेच राष्ट्रवादीकडूनही तसा कोणताही प्रस्ताव आपल्याला आला नाही, असे स्पष्टीकरण खडसे यांनी दिले. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वावर नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यातच बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसेंना आपल्या पक्षात घेण्याबाबत चर्चा केल्याचे सांगितले जात होते. खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिला तर त्यांना संघटनात्मक पद द्यायचे की, राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद, याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे पतंग उडवण्यात आले होते. मात्र, त्या सगळ्या अफवा ठरल्या.

- Advertisement -

बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दल इन्कार केला. एकनाथ खडसे यांच्याविषयीची कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली, असे सांगत जयंत पाटील यांनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबतच्या चर्चांची हवाच काढून टाकली.

त्यानंतर खुद्द खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून आपण आजारपणामुळे मुक्ताई नगरातच आहोत. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा आहे. याआधी शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रवेशाचीही चर्चा होती. मात्र, मी अजून पक्षांतराबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसा काही निर्णय घेतला तर तो मी स्वतः जाहीर करेन, असेही खडसेंनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -