घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणाला वगळून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू; प्रवेशाचा तिढा सुटला

मराठा आरक्षणाला वगळून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू; प्रवेशाचा तिढा सुटला

Subscribe

न्यायालयाचा निकाल येईपर्यंत एसईबीसी प्रवर्ग रद्द करून या वर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून चिंतेत असलेल्या विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.

मराठा आरक्षणामुळे अडीच महिन्यांहून अधिक काळ रखडलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा मार्ग अखेर बुधवारी मोकळा झाला. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत एसईबीसी प्रवर्ग रद्द करून या वर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या वर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देत अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेला २६ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून चिंतेत असलेल्या विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.

मराठा समाजाला शिक्षण व नोकर्‍यांमध्ये आरक्षण देण्यात यावे, या मागणीनुसार राज्य सरकारने मराठा समाजाला एसईबीसीअंतर्गत आरक्षण दिले होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेला विलंबाने सुरुवात झाली. मात्र त्याचवेळी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली. मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेचा झालेला खोळंबा यामुळे विद्यार्थी व पालक चिंतेत पडले होते. अकरावीचे प्रवेश कधी सुरू होणार, कॉलेज कधी सुरू होणार असे प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून विचारण्यात येत होते. आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासंदर्भात राज्य सरकारकडून न्यायालयाकडे करण्यात आलेल्या अर्जावर कोणताही निर्णय होत नसल्याने अखेर राज्य सरकारने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी मराठा आरक्षण वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी सप्टेंबर २०२० पूर्वी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केले असतील परंतु त्यांना प्रवेश देण्यात आले नसेल, अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय अंतरिम स्थगिती उठवण्याच्या निकालापर्यंत लागू राहणार आहे. सामान्य प्रशासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार बुधवारी शिक्षण संचालनालयाकडून अकरावी प्रवेशाची नियमित फेरी राबवण्याचा निर्णय घेत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी हे वेळापत्रक अकरावी प्रवेशांच्या https://mumbai.11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. मुंबई एमएमआर क्षेत्रासह, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश या वेळापत्रकानुसार होणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार 26 नोव्हेंबरपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये एसईबीसी प्रवर्गाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना वर्ग बदलण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही, त्यांनाही अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नियमित फेरी 2 साठी विद्यार्थ्यांना आपले पसंतीक्रम ही बदलता येणार आहेत. प्रवेशप्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क, प्रवेश निश्चिती, कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन करायचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक

  • २६ नोव्हेंबर : रिक्त जागांची यादी जाहीर
  • २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर : एसईबीसी प्रवर्ग बदलण्याची संधी, नवीन विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी
  • २ डिसेंबर : पहिल्या भागातील अर्ज पडताळणी, पसंतीक्रम बदलण्याची संधी
  • ५ डिसेंबर : प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर
  • ५ ते ९ डिसेंबर : विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्चिती करता येणार
  • ९ डिसेबर : प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर जाहीर
  • १० डिसेंबर : तिसर्‍या नियमित फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -