घरताज्या घडामोडीRahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान 'इंडिया'ला धक्के; यात्रा मुंबईत येण्यापूर्वीच...

Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘इंडिया’ला धक्के; यात्रा मुंबईत येण्यापूर्वीच काँग्रेसला गळती

Subscribe

मुंबई – राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा काढली होती. त्या यात्रेची भाजपकडून हेटाळणी करण्यात आली. राहुल गांधींची टर उडवण्यात आली. एक प्रकारे राहुल गांधींच्या पहिल्या यात्रेकडे भाजपने दुर्लक्ष केले. पण भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला पुढच्या काही महिन्यांतच दिसून आला. ज्या-ज्या राज्यातून भारत जोडो यात्रा गेली त्या-त्या राज्यात काँग्रेस मजबूत झालेली दिसली आणि त्यापैकी कर्नाटक, तेलंगाना आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत देखील आली.

यंदा मणिपूर ते मुंबई अशी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा 2.0 केली. आता ज्या-ज्या राज्यातून राहुल गांधींची यात्रा जात आहे, त्याआधी तिथे ‘इंडिया’मध्ये तरी फूट पाडली जात आहे किंवा काँग्रेसच्या नेत्यांना तरी फोडले जात आहे.

- Advertisement -

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘इंडिया’ला धक्के 

भारत जोडो यात्रा पश्चिम बंगालमध्ये येण्यापूर्वी ममता दीदींनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला. यात्रा बिहारमध्ये येण्यापूर्वी इंडिया आघाडी ज्यांनी बांधली ते नितीशकुमार इंडियाला सोडून एनडीएसोबत गेले. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशात येण्यापूर्वीच ‘इंडिया’चे घटक पक्ष राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) अध्यक्ष जयंत चौधरींनी पारडं बदललं आहे. इंडिया आघाडीतील उत्तर प्रदेशमधील दुसरा महत्त्वाचा पक्ष समाजवादी पार्टीने काँग्रेसला पाहिजे तेवढ्या जागा देण्यास नकार देत 11 जागा सोडण्याचे जाहीर करुन आपले 16 उमेदवारही जाहीर केले. यात्रा झारखंडमध्ये येण्यापूर्वी झारखंडचे हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. मात्र त्यांनी इंडिया सोडलेली नाही.

राहुल गांधींची न्याय यात्रा मुंबईत येण्यापूर्वी काँग्रेसला गळती 

यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा 20 मार्चला मुंबईत येणार होती. यात्रेचा कालावधी कमी करण्यात आला आहे. 10 ते 14 मार्च दरम्यानच यात्रा संपण्याची शक्यता आहे. यात्रा मुंबईत येण्यापूर्वीच काँग्रेसला गळती लागली आहे. राहुल ब्रिगेडमधील मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडली आणि ते शिंदे गटात गेले. मुंबईतील अल्पसंख्याक समाजातील नेता बाबा सिद्दीकी हे थेट भाजपमध्ये जाऊ शकत नसल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.

- Advertisement -

मराठवाड्यामध्ये भाजपचे महाजन-मुंडे असे दिग्गज नेते असतानाही तिथे त्यांना भाजपला मोठे करता आले नाही. मराठवाड्याने नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आहे. त्याचे कारण होते, दिवंगत शंकरराव चव्हाण आणि दिवंगत विलासराव देशमुख. मात्र त्यांच्यानंतर अशोक चव्हाण हे लोकनेते नसले तरी प्रशासनावर पकड असलेला नेता. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. असा नेता भाजपने गळाला लावला आहे. त्यांचा पक्ष प्रवेश संभाजीनगरमध्ये होण्याचे निश्चित मानले जाते. संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आहे. संभाजीनगरमध्ये घडलेल्या सामाजिक, राजकीय घडामोडींचे पडसाद हे मराठवाड्यात सर्वदूर पोहोचतात. त्यामुळे पक्ष प्रवेशासाठी संभाजीनगरची निवड भाजप श्रेष्ठींनी केलेली दिसत आहे.

अशोक चव्हाण यांच्यामागे आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा आणि बुलढाणा अर्बन पतसंस्था कर्ज प्रकरणाचा ससेमिरा मागे लागण्याची भीती असल्यामुळेच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असल्याचे मानले जात आहे. आता त्यांच्यासोबत विलासरावांचे दोन्ही आमदार पूत्र जातात का हे पाहाणे महत्त्वाचे राहाणार आहे.

हेही वाचा : Ashok Chavan : ‘आदर्श’सह बुलढाणा अर्बन कर्ज घाटोळा; ‘हे’ आहे काँग्रेस सोडण्याचे कारण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -