घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांना बसला गुगल ट्रान्सलेटरचा फटका! इंग्रजीत नावांचा भलताच अर्थ!

शेतकऱ्यांना बसला गुगल ट्रान्सलेटरचा फटका! इंग्रजीत नावांचा भलताच अर्थ!

Subscribe

सरकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मराठी नावांची संगणकात नोंदणी करताना इंग्रजीत भाषांतर केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळेनासा झाला आहे.

मराठी किंवा इंग्रजी कच्च असणाऱ्यांसाठी गुगलने भाषांतराची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे मराठीचं इंग्रजीत किंवा इंग्रजीचं मराठीत भाषांतर करता येतं. मात्र, हे भाषांतर अगदीच प्राथमिक आणि क्वचित प्रसंगी अतीचुकीचं असू शकतं, याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला आहे. पण सांगलीमधल्या काही शेतकऱ्यांना या गुगल ट्रान्सलेटर भाषांतराचा मोठा फटका बसला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांची नोंदणी संगणकात करण्यात आली. पण शेतकऱ्यांच्या मराठी नावांची संगणकात इंग्रजीत नोंदणी केली गेली आणि तिथेच मोठा घोळ झाला. सकाळने यासंदर्भात दिलेल्या वृत्तानुसार, अनेक शेतकऱ्यांची नावंच या इंग्रजीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बदलल्यामुळे ते शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.

भगवानचं नाव लॉर्ड तर छायाचं झालं शॅडो!

या वृत्तानुसार सांगलीच्या बावची भागामध्ये काही शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी आपली नावनोंदणी केली होती. यासाठी आवश्यक ती कागदपत्र देखील सादर केली. पण नोंदणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याने ही नावं थेट संगणकात टाकून गुगल ट्रान्सलेटरच्या माध्यमातून तिचं इंग्रजी भाषांतरच करून टाकलं. त्यामुळे उत्तम नावाचं बेस्ट असं भाषांतर झालं, भगवान नावाचं लॉर्ड असं तर शरद नावाचं स्प्रिंग असं भाषांतर झालं. त्याशिवाय छाया नावाच्या शेतकरी महिलेचं नाव शॅडो असं नोंदवलं गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. आडनावांमध्ये सुतारचं कारपेंटर आणि कोष्टीचं स्पायडरमॅन असं भाषांतर झालं. त्यामुळे शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र असून देखील त्यांना लाभ मिळेनासा झाला आहे.

- Advertisement -

महा-ई-सेवा केंद्राचा पर्याय

दरम्यान, हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नावात दुरुस्ती करून घेण्यासाठी महा ई-सेवा केंद्रावर जाण्यासाठी सांगितलं. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीसाठी पुन्हा शेतकऱ्यांनाच महा ई-सेवा केंद्रावर तासन् तास उभं राहावं लागत असल्याची तक्रार केली जात आहे.


हेही वाचा – एका लग्नासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी बदलला कार्यक्रम!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -