हा तर देशाच्या एकतेवरच घाला – शरद पवार

एकेकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या यशवंत सिन्हा यांनीच आता भाजप सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरूद्ध दंड थोपटले आहेत. गेट वे ऑफ इंडियापासून त्यांनी या कायद्याविरोधात गांधी शांती यात्रेला सुरुवात केली असून यावेळी विरोध पक्षांतील अनेक नेते उपस्थित होते.

gandhi shanti yatra 3

‘नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. या नाराजीचं निराकरण करणं आवश्यक आहे. हे साध्य करायचं असेल, तर त्यासाठी महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या सत्याग्रहाचाच मार्ग योग्य आहे. हा नवीन कायदा म्हणजे देशाच्या एकतेवरच घाला आहे’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंद (एनपीआर) यांचा निषेध करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ विविध पक्षाचे नेते जमले होते. गेट वे ऑफ इंडियापासून ‘गांधी शांती यात्रे’ला यावेळी सुरुवात करण्यात आली. ही यात्रा महात्मा गांधींच्या जयंतीदिनी दिल्लीच्या राजघाटवर पोहोचणार आहे. यावेळी शरद पवार यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते.