घरमहाराष्ट्रअतिवृष्टीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, दुप्पट नुकसान भरपाई मिळणार

अतिवृष्टीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, दुप्पट नुकसान भरपाई मिळणार

Subscribe

मुंबई  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसात शेतपीके, बागायतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी  दिल्या जाणाऱ्या मदतीपेक्षा  दुप्पट दराने मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. याविषयीचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला असून यात दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिरायतसाठी १३ हजार ६००, बागायतीसाठी २७ हजार प्रतिहेक्टर तर बहुवार्षिकसाठी ३६ हजार प्रतिहेक्टर मदत केली जाणार आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. या मागणीनंतर मंत्रिमंडळ बैठक घेऊन याविषयीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून पीके आणि शेतजमिनींच्या नुकसानीसाठी  निधी वितरित करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या निधीची तरतूद हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे.

- Advertisement -

ही मदत वितरणाची आणि लाभार्थ्यांच्या यादी जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून ही रक्कम काढावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पीके-प्रचलित दर- मदतीचे वाढीव दर

- Advertisement -

जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी – ६८०० रुपये प्रतिहेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत- आता१३ हजार ६०० रुपये प्रतिहेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत

बागायत पिकांच्या नुकसानीसाठी – १३हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत- आता २७ हजार प्रतिहेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत

बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी – १८ हजार  रुपये प्रतिहेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत- आता ३६हजार प्रतिहेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -