घरमहाराष्ट्रअखेर नाणार रद्द, उद्योगमंत्र्यांनी केली घोषणा!

अखेर नाणार रद्द, उद्योगमंत्र्यांनी केली घोषणा!

Subscribe

नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा अखेर सरकारकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली आहे.

शिवसेना-भाजप युतीसाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणून मांडण्यात आलेल्या नाणार प्रकल्पासंदर्भातला मुद्दा आता निकाली निघाला आहे. हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याचं शनिवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये घोषित करण्यात आलं. ‘जिथे स्थानिकांची परवानगी असेल, पसंती असेल अशाच ठिकाणी हा प्रकल्प होईल, कुणावरही जबरदस्ती केली जाणार नाही’, असं यावेळी सुभाष देसाई यांनी जाहीर केलं. त्यामुळे नाणार विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या आंदोलकांना आणि स्थानिक ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, आता ‘नाणार प्रकल्प रद्द करू नये’, अशी कंठरवाने भूमिका मांडणारे स्थानिक भाजप नेते प्रमोद जठार काय भूमिका घेतात? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.


तुम्हाला हे माहितीये का? – उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजनांसाठी युती केली!

नाणार रद्द करण्याच्या केलेल्या घोषणेनुसार त्यासंदर्भात निर्देश मला प्राप्त झाले. जमीन विनाअधिसूचित करण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत. गॅझेट प्रसिद्ध केले जाईल. जनतेला दिलेला जो शब्द दिला आहे तो आम्ही पूर्ण करत आहोत.
जिथे जनतेला प्रकल्प हवा असेल, स्वागत होणार असेल, तिथे प्रकल्प व्हायला आमचा विरोध नाही.

सुभाष देसाई, उद्योगमंत्री

काय होता नाणारचा वाद?

दरम्यान, नाणार पकल्पावरून कोकणात एकीकडे रान उठलेले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘नाणार रद्द होणार असेल तरच युतीचा निर्णय घेऊ’, अशी भूमिका घेतली होती. याची गंभीर दखल घेत ‘लोकांचा विरोध असेल तर नाणारची अधिसूचना रद्द करू’, अशी भूमिका सरकारने घेतली होती. अखेर आज ही अधिसूचना रद्द झाल्याचे देसाई यांनी सांगितले. दरम्यान ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपासोबत युतीचा निर्णय घेण्यापूर्वी नाणार प्रकल्प रद्द करावा’, अशी मागणी देखील कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली  होती. प्रकल्पक्षेत्रातील १४ ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर करून घेतले होते. तसेच कोकणातील सर्व आमदार व खासदारांनी प्रकल्पाला विरोध केला. स्थानिक जनतेने भूसंपादनापूर्वी आवश्यक अशी जमीन मोजणीही होऊ दिली नव्हती. तसेच नाणार परिसरातील रहिवासी, कोकणातील पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाविरोधात तीव्र भूमिका घेतली होती. त्यामुळे या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -