घरताज्या घडामोडीभास्कर जाधवांनी राष्ट्रवादी सोडल्यावर त्यांचे कट्टर विरोधक पुन्हा राष्ट्रवादीत परतले

भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी सोडल्यावर त्यांचे कट्टर विरोधक पुन्हा राष्ट्रवादीत परतले

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांचे जुने कट्टर विरोधक रमेश कदम यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात घेतले आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादीने आपले अस्तित्व अबाधित राखले आहे. एकेकाळी कोकणात राष्ट्रवादी पक्षाने चांगलीच मुसंडी मारली होती. मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे अनेक आमदार इतर पक्षात गेले होते. आता पुन्हा रमेश कदम यांच्या रुपाने काही नेते पुन्हा राष्ट्रवादीत परतू लागले आहेत.

चिपळूनचे माजी आमदार रमेश कदम हे भास्कर जाधव यांचे कट्टर विरोधक मानले जातात. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर परत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही काळ काँग्रेसकडून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदही सांभाळले. मात्र त्यांची पदावरुन गंच्छती केल्यामुळे ते नाराज होते. त्यातच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मुळ पक्षात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसला रमेश कदम यांच्या स्वगृही परतण्याचा फायदाच होणार आहे. यापुर्वी रत्नागिरी, चिपळून, दापोली, गुहाघर मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे शिवसेनेत गेले. तर २०१९ च्या निवडणुकीत गुहाघर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव हे देखील शिवसेनेत गेले होते. तर दापोली विधानसभेच्या संजय कदम यांचा पराभव झाला होता. सद्यस्थितीत चिपळून विधानसभा मतदारसंघातून फक्त शेखर निकम हे एकमेव आमदार राष्ट्रवादीकडे आहेत.

चिपळून येथे शेखर निकम हे विद्यमान आमदार असल्यामुळे पुढच्या निवडणुकीत रमेश कदम कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार किंवा मागच्या वेळेप्रमाणे ते रायगड लोकसभा लढविणार का? हे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत. दरम्यान भास्कर जाधव यांनी ऐन मोक्याला शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्यांच्या हाती फारसे काही आलेले नाही. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबतच एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केल्यामुळे भास्कर जाधव यांचे मंत्रिपद हुकलेले आहे. त्यामुळेच भास्कर जाधव हे शिवसेनेत नाराज असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -