घर उत्तर महाराष्ट्र गणरायाचे दमदार सरींनी स्वागत, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

गणरायाचे दमदार सरींनी स्वागत, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

Subscribe

नाशिक : शहरासह जिल्ह्यात तसेच, उत्तर महाराष्ट्रात १५ ते १९ सप्टेंबर या काळात वेगवेगळ्या भागांत दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज जिल्ह्यातील हवामान अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. ९ तारखेपासून पाठ फिरविलेल्या पावसाने शुक्रवारी (दि.१५) शहराच्या काही भागांत हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यात मात्र वाढ झाली होती.
पूर्वेकडून आलेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे उत्तर महाराष्ट्रात १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबारसह नाशिकच्या उत्तर-पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी लागणार असली तरी हा पाऊस दीर्घकाळ राहण्याची शक्यता नाही.

नाशिकच्या दिंडोरी, चांदवड, मनमाड, सटाणा, देवळा, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, १९ सप्टेंबरनंतर गणेशोत्सव काळातही पावसाचा मुक्काम कायम राहाण्याचा अंदाज हवामान अभ्यासक व प्रगतीशील शेतकरी रामचंद्र चुंबळे यांनी माय महानगरशी बोलताना व्यक्त केला. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत यंदाचे प्रमाण ५० टक्के इतके आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत उत्तर महाराष्ट्रात १०६.५ टक्के पाऊस झाला होता. यंदा हे प्रमाण आता ६५ टक्क्यांवर आले आहे. परतीच्या पावसाच्या ढगांमुळे सप्टेंबर महिनाअखेर व ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही वळीवाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ६२ टक्के पाऊस झाला असला तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ५० टक्के आहे. नाशिक जिल्ह्यातील २४ पैकी भावली, वालदेवी, आळंदी, हरणबारी, केळझर, नांदूर, वाघाड, भोजापूर ही आठ धरणे भरली आहेत. गिरणा धरण आतापर्यंत ५३ तर, तिसगाव २९ टक्के भरले आहे.

नाशिकच्या गंगापूर धरणात ९० टक्के साठा ठेवण्यात आला आहे. गंगापूर धरण क्षेत्रात ९०, पालखेड मध्ये ९३, ओझरखेड ८०, दारणा ९३, गिरणा ७९ टक्के साठा उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्यातील शेती व्यवसायाचे अर्थकारण अवलंबून असलेल्या मका, ऊस, कांदा, द्राक्ष आणि अन्य भाजीपाला लागवडीसाठी नाशिक जिल्ह्यात आणखी पावासाची गरज आहे. हवामानशास्त्र अभ्यासकांच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास या पावसाचा फायदा रब्बी हं गामासाठी होईल.

नाशिक जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी (ऑगस्ट पर्यंत)

 • नाशिक – ६०.८० टक्के
 • त्र्यंबकेश्वर – ६८.५० टक्के
 • दिंडोरी – ११९.२० टक्के
 • चांदवड – ६३.५० टक्के
 • मालेगाव – ५४.४० टक्के
 • सटाणा – ७१.१० टक्के
 • कळवण – १०४.५० टक्के
 • निफाड – ७०.३० टक्के
 • सिन्नर – ४९० टक्के
 • नांदगाव – ४७.२० टक्के
 • येवला – ६६.३० टक्के
 • पेठ – ७३.३० टक्के
 • सुरगाणा – ७६.४० टक्के
 • देवळा – ६९.२० टक्के
 • इगतपुरी – ५०.४० टक्के
 • एकूण – ६९.२ टक्के
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -