घरमहाराष्ट्ररोजंदारीवरील ‘कार्यकर्त्यां’ना अच्छे दिन!

रोजंदारीवरील ‘कार्यकर्त्यां’ना अच्छे दिन!

Subscribe

‘स्वाभिमानी’त केला पुनर्प्रवेश

तत्व, निष्ठा अशा गोष्टी राजकारणातून जवळपास हद्दपार झाल्यामुळे आयाराम-गयारामांप्रमाणे रोजंदारीवरील ‘कार्यकर्त्यां’नाही सध्या अच्छे दिन आले आहेत. अनेकदा असे हे तथाकथित कार्यकर्ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे झेंडे हाती घेत असल्याचे गमतीशीर दृश्यही या निमित्ताने पहावयास मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीचे घोडा मैदान जवळ आल्याने सभा, रॅली, गाठीभेटी यांचा जोर वाढलेला आहे. बदललेल्या राजकारणात कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे प्रचाराला येण्याचे प्रमाण अल्प असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही काहीतरी लालूच दाखवून प्रचारासाठी घराबाहेर काढले जाते. परंतु ही संख्या अल्पशी असल्याने पैसे मोजून तथाकथित कार्यकर्त्यांना कामाला लावले जात आहे. खाण्यापिण्याची होणारी चंगळ आणि सोबत खिसाही गरम होत असल्याने हे तथाकथित कार्यकर्ते प्रचारासाठी किंवा सभेत गर्दी दिसावी म्हणून एका पायावर तयार असतात.

- Advertisement -

एक काळ असा होता की पदरमोड करून नेत्याच्या विजयासाठी झटणारी उत्स्फूर्त कार्यकर्त्यांची फौज असायची. मिळेल ते खावून किंवा प्रसंगी उपाशी राहून प्रचार करणारे निष्ठावंत कार्यकर्तेही होते. मात्र सकाळी एका पक्षात असलेला आपला नेता सायंकाळपर्यंत त्याच पक्षात असेल याची खात्री देता येत नसल्याने कार्यकर्तेही बिथरत आहेत. त्याचा परिणाम प्रचारात निष्ठावंत कार्यकर्त्यांची संख्या रोडावण्यात झाला. स्वाभाविक बेकार तरुण, गावउनाड पोरटोरं यांना हेरून त्यांच्यावर प्रचाराची (!) जबाबदारी सोपविण्यात येत आहे. एखाद्या नेत्याची सभा असेल तर याच तथाकथित कार्यकर्त्यांना माणसं जमविण्याचे ‘सब कॉन्ट्रॅक्ट’ दिले जाते.

वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे या तथाकथित कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. सकाळचा नाश्ता, दुपारचे भोजन, रात्रीचे सुग्रास भोजन, प्रवासाची साधने आणि वरती हातावर 300 ते 500 पर्यंतची रक्कम टेकवली जात आहे. प्रचाराचा ज्वर जसजसा वाढेल तसा रोजंदारीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -