घरमहाराष्ट्रगोवर - रुबेला लस पूर्णपणे सुरक्षित - जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

गोवर – रुबेला लस पूर्णपणे सुरक्षित – जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

Subscribe

सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसात गोवर - रुबेला लस विद्यार्थ्यांना देण्यास नकार दिला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी गोवर - रुबेला लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

गोवर आणि रुबेला या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. गोवर आणि रुबेला हा विषाणूजन्य आजार असून अतिशय घातक आहे. त्यावर, नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र याबाबत सोलापूरमधील ४१ शाळांनी गोवर – रुबेला लस विद्यार्थ्यांना देण्यास नकार दिला होता. मात्र त्यावर सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गोवर – रुबेला लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्हा सुकाणू समितीची बैठक झाली आहे.

९ लाख विद्यार्थ्यांना करण्यात आले लसीकरण

जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरणाची मोहिम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ९ लाख ५१ हजार ५१७ बालकांना लसीकरण करण्यात येणार असून ३ हजार २३५ शाळांमधून ५ लाख १८ हजार ७६२ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या इंजेक्शनमुळे बालकांमध्ये उलटी अथवा चक्कर येण्याची लक्षणे दिसून येतात. लसीकरणानंतर योग्य ती वैद्यकीय सुविधा देण्याबाबत स्थानिक आरोग्य केंद्राने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

बालरोग विभागात विशेष कक्ष

सोलापूर महानगरपालिका क्षेत्र तसेच उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील बालकांना लसीकरणानंतर त्रास होत असल्यास त्यांच्याकरता एक विशेष सेवा करण्यात आली आहे. ज्या बालकांना त्रास होत आहे अशा बालकांना वैद्यकीय उपचारासाठी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे बालरोग विभागात विशेष कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्याबाबत डॉ. भोसले यांनी सूचना दिल्या आहेत. बैठकीत जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच मार्गदर्शक सूचनानूसार ही मोहिम सुरु ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. जी बालके आजारी असतील आणि लसीकरणानंतर त्यांचा आजार अधिक बळावू नये याकरिता त्यांना सद्यस्थितीत लसिकरण करण्यात येवू नये. तसेच लसीकरणापूर्वी कोणत्याही आजाराने त्रस्त नसल्याची खातरजमा करावी, लसीकरणामध्ये पालकांचा सहभाग घ्यावा. त्याचप्रमाणे पालकांना गोवर रुबेला लसीकरणाचे महत्व अवगत करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

गोवर रुबेलाचे सन २०२० पर्यंत निर्मूलन करण्याचे केंद्र शासनाचे उद्दीष्ट्य असून नागरिकांनी घाबरुन न जाता आपल्या पाल्यास लसीकरण करुन घ्यावे. या कामासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांच्या संचालकांनी मोहिमेत आपला सक्रीय सहभाग नोंदवून आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला बाल कल्याण विभागास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.

- Advertisement -

वाचा – सोलापूर येथे ४१ शाळांचा गोवर – रुबेला लस घेण्यास नकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -