घरमहाराष्ट्रमहिलांवरील अत्याचाराविरोधात गुलाबी गँग सज्ज

महिलांवरील अत्याचाराविरोधात गुलाबी गँग सज्ज

Subscribe

महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलींचे होणारे लैंगिक शोषण, महिलांना एकट्याने प्रवास करताना करावा लागणारा विकृतीचा सामना या पार्श्वभूमीवर स्वत:च्या संरक्षणासाठी मुंबईतील महिलांनी पुढाकार घेत ‘गुलाबी गँग’ स्थापन केली आहे. गँगच्या माध्यमातून या महिला शाळा व कॉलेजमधील मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. गँगमध्ये सर्वसामान्य महिलांप्रमाणेच डॉक्टर, इंजिनिअर, अ‍ॅडव्होकेट, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व निवृत्ती एसीपी अधिकार्‍यांसह 65 महिला सहभागी झाल्या आहेत.

हिंगणघाटमध्ये शिक्षिकेवरील अत्याचार, त्यापाठोपाठ कोल्हापूरमध्ये 10 जणांनी बालिकेवर केलेला अत्याचार यामुळे महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारने ठोस भूमिका घेणे अपेक्षित असताना सरकारकडून कोणतेच पाऊल उचलण्यात येत नाही. त्यामुळे स्वत:चे संरक्षण स्वत:च करण्याचा निर्णय घेत मुंबईतील महिलांनी महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांची गँग तयार करण्याचा निर्णय घेत ‘गुलाबी गँग’ स्थापन केली आहे.

- Advertisement -

गँगच्या माध्यमातून शाळा व कॉलेजमधील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. यामध्ये मुलींना कराटे, बॉक्सिंगचे धडे देण्याबरोबरच त्यांना प्रवासामध्ये एखादा अनूचित प्रकार घडल्यास कशाप्रकारे त्याचा सामना करावा व स्वत:ची सुटका करून घ्यायची याचेही धडे त्यांना देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेतील मुलींना चाईल्ड हेल्पलाईन तर मुलींना महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या हेल्पलाईनची माहिती देण्यात येणार आहे. गुलाबी गँगमध्ये आतापर्यंत 65 महिला सहभागी झाल्या असून, कॉलेजमधील मुली गँगमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सूक असल्याचे गुलाबी गँगचे संस्थापक अध्यक्षा आमदार मनिषा चौधरी यांनी सांगितले.

ट्रेन, बसमधून जाताना किंवा बँक, बाजारात गेल्यावर महिलांनी कोणती काळजी घ्यायची
स्कूलबस, रिक्षामधून जाताना तसेच अल्पवयीय मुलींना ‘टच मी नॉट’ या उपक्रमातून चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याची माहिती देऊन अनोळखी माणसाने कोठे स्पर्श केल्यावर काय करावे याची माहिती गुलाबी गँग रोटरॅक्ट संस्थेच्या माध्यमातून देणार आहे. पथनाट्य, हळदीकुंकू कार्यक्रम, महिला मंडळांचे कार्यक्रम, शाळा व कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवून गुलाबी गँग महिला व मुलींशी संपर्क साधणार असल्याची माहिती गुलाबी गँगच्या संस्थापक मनिषा चौधरी यांनी सांगितले.

- Advertisement -

लवकरच टोल फ्री क्रमांक
गुलाबी गँगला महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. पोलिसांचाही गँगच्या कार्याला पाठिंबा मिळत आहे. अत्याचार होणार्‍या महिलांनी आमच्याशी थेट संपर्क साधावा यासाठी आम्ही टोल फ्री क्रमांक घेत आहोत तो मिळाल्यावर महिलांना देण्यात येणार आहे. तोपर्यंत आमदार मनिषा चौधरी यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

स्टॉप अ‍ॅसिड अटॅक कार्यक्रम
एकतर्फी प्रेमातून महिलांवर अ‍ॅसिड फेकणे व पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याच्या प्रकारामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी खासगी, अनुदानित व पालिका शाळा, कॉलेज, कॉर्पोरेट कार्यालय, झोपडपट्टी विभागातून प्रबोधन करण्यात येणार आहे.

महिलांचे संरक्षण आणि मुलींचे सशक्तीकरण हे आमचे ध्येय आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत आम्हाला सरकारकडून अपेक्षा नाही. त्यामुळे आम्ही पुढाकार घेत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, कॉलेज व महिला मंडळातून प्रबोधन करण्यात येणार आहे. गुलाबी गँग संपूर्ण मुंबईत पसरणार आहे. – मनिषा चौधरी, संस्थापक, गुलाबी गँग व आमदार

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -