घरमहाराष्ट्रनाशिकएसटीचे ऐतिहासिक 'दसरा' बुकिंग

एसटीचे ऐतिहासिक ‘दसरा’ बुकिंग

Subscribe

दसरा मेळाव्याला २८० बसेसचे नियोजन : सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल

नाशिक : कर्मचार्‍यांच्या संपामुळे आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या एसटी महामंडळाला शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांच्या माध्यमातून ऐतिहासिक ‘बुस्ट’ मिळाला आहे. खासगी कार्यक्रमासाठी एकाच दिवशी जिल्ह्यातून 280 बसेसचे बुकिंगची ही पहिलीच वेळ असल्याने महामंडळाच्या उत्पन्नात सुमारे 50 लाख रुपयांची भर पडणार आहे. दरम्यान, यात्रोत्सव व दसरा सणामुळे सर्वसामान्य प्रवाशांना वेळेवर बस मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.

मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. यात ठाकरे गट व शिंदे गट असे स्वतंत्र मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केल्यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी दोन्ही ठिकाणी होणार आहे. यानिमित्त शिंदे गटाने मुंबईतील बीकेसी या मैदानावर जाण्यासाठी जिल्ह्यातून 280 गाड्यांचे बुकिंग केले आहे. प्रत्येक गाडीत 44 प्रवाशी अर्थात शिवसैनिक असतील. असे साधारणत: 12 हजार 320 प्रवाशी बुधवारी सकाळी मुंबईकडे निघणार आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाने नांदगाव, मनमाड, पेठ, सुरगाणा, येवला, इगतपुरी या ठिकाणांहुन या बसेसची व्यवस्था केली आहे. मंगळवारी (दि.4) रात्री या बसेस गावात मुक्कामी येतील. बुधवारी सकाळी निर्धारित वेळेत या गाड्या मुंबईच्या दिशेने निघतील.

- Advertisement -

साधारणत: दुपारी 2 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे नियोजन आहे. बीकेसी या मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याने त्यादृष्टीने हे नियोजन केले आहे. एखाद्या खासगी कार्यक्रमासाठी एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात एसटीचे बुकिंग होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते. गणेशोत्सव असेल किंवा पंढरपूर यात्रा यासाठी गाड्यांचे बुकिंग़ होते. पण एका दिवशी आणि तेही खासगी कार्यक्रमासाठी बुकिंग होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे एसटी महामंडळातील अधिकारी सांगतात. त्यामुळे सप्तश्रृंगी गडावर सुरु असलेल्या यात्रोत्सवाव्यतिरीक्त इतर ठिकाणची प्रवाशी वाहतूक रोडावली आहे.

शिवशाही अन् एशियाड बसेसनेच करा प्रवास

नाशिक येथील ठक्कर बस स्थानक (नवीन सीबीएस) प्रशासनाने फक्त शिवशाही आणि एशियाड गाड्या सोडल्याने नागरिकांना जास्त भाडे देवून प्रवास करावा लागत आहे. सायंकाळच्या वेळेत अनेक मुली आणि महिला या लाल गाडीच्या प्रतीक्षेत असतात. नियमित प्रवास करणारे, पास धारक यांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच बसेस मुंबईला गेल्यामुळे इतर ठिकाणी बसेस उपलब्ध होत नाहीत. त्याचा सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -