घरक्राइमकिरीट सोमय्या कथित व्हिडीओ प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू, सायबर सेलची घेणार मदत

किरीट सोमय्या कथित व्हिडीओ प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू, सायबर सेलची घेणार मदत

Subscribe

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांची एक कथित अश्लील व्हिडीओ क्लिप दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याप्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले होते. विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यासंदर्भात पत्रकार परिषदा घेत ‘हिसाब तो देना होगा,’ असे छातीठोकपणे सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक, हसन मुश्रीफ तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंबीय, खासदार संजय राऊत आणि अनिल परब अशा अनेकांवर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याविषयीची कागदपत्रे देखील आपण तपास यंत्रणांना सादर केल्याचा दावाही त्यांनी वारंवार केला आहे. पण सोमवारी एका वृत्तवाहिनीने दाखवलेल्या कथित अश्लील व्हिडीओ क्लिप प्रसारित केल्याने किरीट सोमय्या अडचणीत सापडले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवार गटाने सरकारलाच सुनावत केली किरीट सोमय्यांच्या चौकशीची मागणी

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर अंबादास दानवे यांनी पेनड्राइव्ह सादर करत यात आठ तासांचे व्हिडीओ असल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांच्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी, किरीट सोमय्या यांची केंद्रीय सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची तसेच, या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली. त्यावर, किरीट सोमय्या यांच्याबाबत असलेला विषय हा गंभीर आहे. या प्रकरणात ज्या काही तक्रारी असतील त्या देण्यात याव्यात, त्यांची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

आता मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहण्यास सांगण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांनी सहपोलीस आयुक्तासह अतिरिक्त पोलीस आयुक्तांची एक बैठक बोलाविली होती. त्यानंतर गुन्हे शाखेकडे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सोपविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सोमय्या यांच्या कथित अश्‍लील व्हिडीओ प्रकरणाच्या तपासाला गुन्हे शाखेने सुरुवात केली आहे.

याप्रकरणी तांत्रिक तज्ज्ञांसह सायबर सेलची मदत पोलीस घेणार आहेत. व्हिडीओची सत्यता पडताळून समोरील महिला कोण? तिचे किरीट सोमय्याशी काय संबंध होते? त्यांच्यातील व्हिडीओ चॅट केव्हा, कधी आणि किती वेळा झाले? याचा आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याशिवाय, हा व्हिडीओ कसा लिक झाला? तो कोणाला केला होता? वृत्तवाहिनीला हा व्हिडीओ कोणी दिला? याचा तपास केला जाणार आहे. अशाच प्रकारे इतर 30 ते 35 व्हिडीओ आहेत, असे बोलले जाते. त्यामुळे ते व्हिडीओ ताब्यात घेण्यात येणार आहेत. लवकरच या प्रकरणाचा चौकशी अहवाल पोलीस आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -