घरमहाराष्ट्रविवाहितेवर बलात्कार करुन दागिने केले लंपास

विवाहितेवर बलात्कार करुन दागिने केले लंपास

Subscribe

२१ वर्षांच्या विवाहितेवर बलात्कार करुन तिचे दागिने पळवून नेणाऱ्या एका पत्रकारास नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे.

कांदिवली येथे राहणार्‍या एका २१ वर्षांच्या महिलेवर बलात्कार करुन तिच्याकडील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन पळून गेलेल्या एका पत्रकाराला दोन वर्षांनी नालासोपारा परिसरातून कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. रईस खान असे या ५१ वर्षीय पत्रकाराचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने १ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पीडित महिला ही २१ वर्षांची असून ती आरोपीच्या मुलीची मैत्रिण आहे. तिचा एका तरुणासोबत विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. हा प्रकार रईस खानला समजताच त्याने तिला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. रईसचे कांदिवली परिसरात एक दैनिक असून या दैनिकाच्या माध्यमातून तिला न्याय देण्याचे प्रयत्न करुन त्याने तिच्याशी जवळीक निर्माण केली होती. त्यानंतर तो तिच्यासोबत राहत होता. याच दरम्यान त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर तिच्याकडील सोन्याचे दागिने घेऊन तो पळून गेला. हा प्रकार या पीडित महिलेच्या लक्षात येताच तिने २०१७ साली कांदिवली पोलिसांत रईस खानविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कांदिवली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्कारासह फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा नोंदविला. मात्र गुन्हा दाखल होताच तो पळून गेला. त्याच्या मोबाईलचे सीडीआर तसेच तांत्रिक माहितीचे अवलोकन करुनही तो पोलिसांना सापडत नव्हता. ही शोध मेाहीम सुरु असतानाच रईस हा नालासोपारा परिसरात राहत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दिपक हिंडे यांना मिळाली. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंदकुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंदाकिनी नरोटे, उपनिरीक्षक दिपक हिंडे, पोलीस हवालदार पय्यर, सपकाळ, वैभव पवार, चौगुले, क्षीरसागर यांनी नालासोपारा येथे साध्या वेशात पाळत ठेवून दोन वर्षांपासून फरार असलेल्या रईस खानला अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वत:ला पत्रकार म्हणविणारा रईस हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध कांदिवलीसह सहार, दिडोंशी पोलीस ठाण्यात मारामारी, जिवे मारण्याची धमकी देणे, रॉबरी, हुंड्यासाठी शारीरिक शोषण करणे अशा गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -