घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखरेंचे खोटे कारनामे : कम्प्युटर अनलॉक करत जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या निधीवर दरोडा

खरेंचे खोटे कारनामे : कम्प्युटर अनलॉक करत जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या निधीवर दरोडा

Subscribe

तक्रारी असल्यास करा ‘आपलं महानगर’शी संपर्क जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या लाचखोरीची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून झडत होती. परंतु, त्यांचे हात एवढ्या वरपर्यंत पोहोचलेले होते की, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. आता मात्र खरेंचे खोटे कारनामे पुढे येत आहेत. या संदर्भात ‘आपलं महानगर’मध्ये बुधवार (दि. १७)पासून ‘खरेंचे खोटे कारनामे’ ही वृत्त मालिका सुरु झाली आहे. खरेंच्या कारनाम्यांसदर्भात पुराव्यांसह माहिती असल्यास ९९७५५४७६१६ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

नाशिक : लाचखोर उपनिबंधक सतीश खरे हा जिल्हा बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्याने गटसचिवांच्या प्रोत्साहन अनुदानावरदेखील अतिशय नियोजनबद्धरित्या डल्ला मारला. या बहाद्दराची हिंमत एवढी होती की, कुणालाही न जुमानता त्याने बँकेच्या कार्यालयीन वेळेनंतर बेकायदेशीररित्या संगणक अनलॉक करत बँकेच्या विविध शाखांतून एकाचवेळी लाखो रुपये रोखीने काढले. हे पैसे कसे काढले, कुणाच्या हाती दिले, पैसे मॅनेज करायचे आदेश कोण देत होते यासंदर्भातील अनेक धक्कादायक बाबी आपलं महानगरच्या हाती लागलेल्या ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे दरम्यान, प्रोत्साहन अनुदानावर सतीश खरे आणि टोळीने एकप्रकारचा दरोडा टाकला असून, वरिष्ठ पातळीवरुन या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.

लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असतानाचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खरेच्या मुसक्या आवळल्यामुळे त्याच्या दहशतीखालील असंख्य कर्मचार्‍यांनी मोकळा श्वास घेतला आहे. खरेच्या कामकाजावर नाराज असलेल्या जिल्हा बँकेतील कर्मचारी संघटनेने त्याचवेळी त्याच्या कार्यपद्धतीविरूद्ध एल्गार पुकारला होता. खरेचे कामकाज अत्यंत भ्रष्ट असून, त्याला जिल्हा बँकेतून बाहेर काढावे यासाठी कर्मचारी संघटनांनी मोठा संघर्ष केला. मात्र, राजकीय आणि उच्चपदस्थ अधिकार्‍यांचा वरदहस्त लाभल्याने खरे हा बँकेच्या मानगुटीवर घट्ट चिकटून बसला होता. त्याने दडपशाहीच्या जोरावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पुरेपुर उपभोग घेतला. स्वत:सह त्याने त्याच्या टोळीचेदेखील चांगभले केल्याचे या संपूर्ण प्रकरणातून दिसून येत आहे.

- Advertisement -

गटसचिवांना अनुदान देण्याचा विषय अत्यंत गंभीर असताना या बहाद्दराने शब्दच्छल करून संचालकांच्या मूळ ठरावातच बदल केला. हे करताना त्याला बँकेच्या काही संचालकांचे पाठबळ मिळाल्याची बँक वर्तूळात चर्चा आहे. जिल्ह्यातील गटसचिवांवर जिल्हा उपनिबंधक म्हणून खरेचे नियंत्रण होते. त्यामुळे गटसचिवांचा उपयोग त्याने सालगड्यासारखा करून घेतला. या गटसचिवांना वेतनदेखील वेळेवर दिले जात नव्हते. अशावेळी त्यांच्या मानधनावर खरेची वक्रदृष्टी पडल्याने हे मानधन मिळण्यासाठी त्याने शासनाच्या डोळ्यांत धूळफेक केली. गटसचिवांच्या प्रोत्साहन मानधनाबाबत त्याने एकप्रकारे शासनालाच आव्हान दिले होते. असे असतानाही वरिष्ठ स्तरावरून याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गटसचिवांना अनुदान देण्यासाठी खरेने नियमबाह्य पद्धतीने बँकेतील संगणक अनलॉक केला. त्यासाठी बँकेतील संगणक हेड आणि आरटीजीएस हेड यांची मदत केली. बँकेच्या नियमानुसार एकावेळी ५ हजार रुपये काढता येत होते. मात्र, खरे याने संगणक अनलॉक करत बँकेच्या वेळेनंतर म्हणजेच सायंकाळी ५ वाजेनंतर जिलव्ह्यातील विविध शाखांमधून एकाचवेळी लाखो रुपये रोखीने काढले. या प्रकारामुळे खरे आणि त्याच्या टोळीने एकप्रकारे जिल्हा बँकेवर राजरोजपणे दरोडा टाकल्याचेच बोलले जात आहे.

खरे आणि टोळीने विविध कार्यकारी संस्थांना मिळालेल्या बहुतांश रकमा तालुक्यातील शाखांमधून न काढता वेगळ्याच शाखांमधून काढल्याने हा संपूर्ण प्रकार संशयाच्या भोवर्‍यात अडकला आहे. काढलेल्या रक्कमा घेण्यासाठी खरेने गटसचिव देवीदास नाठे आणि गटसचिव विलास पेखळे यांची नियुक्ती केली. यांनी एकाचवेळी दिंडोरी येथील शाखेतून एकाचवेळी २७ लाख रुपये काढले. हे पैसे घेण्यासाठी तात्कालीन अध्यक्षांचा स्वीय सहायक आणि दिंडोरी येथील एक ज्येष्ठ संचालक उपस्थित असल्याने खरेला संचालक मंडळाचेच पाठबळ असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या सभासदांनी रक्ताचे पाणी करून बँक मोठी केली, त्या सभासदांना नियमानुसार एकावेळी ५ हजार रुपये देण्यात येत होते. मात्र, खरे आणि टोळीने एकाचवेळी लाखो रुपयांची रोकड काढून बँकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला. विविध कार्यकारी संस्थांना प्राप्त २ टक्के गाळ्याच्या रकमा दिंडोरी तालुक्यातील विविध शाखांमधून काढल्या.

- Advertisement -

मालेगाव तालुक्यातील संस्थांना प्राप्त रकमा देवळा तालुक्यातून काढल्या. नांदगाव तालुक्याच्या रकमा कळवण मार्केटयार्ड शाखेतून, कळवण तालुक्याच्या रकमा कळवण मार्केट यार्ड क्रमांक ४० शाखेतून, नाशिक तालुक्यातील रकमा कळवण शाखेतून, देवळा तालुक्यातील रकमा देवळा तालुक्यातूनच काढण्यात आल्या. इगतपुरी तालुक्याच्या रकमा वाडीवार व कवडदरा शाखांतून, सटाण्याच्या रकमा देवळ्यातून, चांदवडच्या रकमा कळवणमधून, निफाडच्या रकमा देवळ्यातून, सिन्नरच्या रकमा दिंडोरीतून काढल्या. तर, येवला तालुक्याच्या रकमा जिल्हा बँकेच्या कर्जखात्यात जमा करण्यात आल्या. अशापद्धतीने खरे याने पदाचा गैरवापर करून शाखा अधिकार्‍यांना धमकावत एकाचवेळी एवढ्या शाखांतून बेकायदेशीरपणे पैसे काढले. हा बँकेवर पडलेला सर्वात मोठा दरोडा मानला जात असून, हा पैसा नेमका कुणाच्या खिशात गेला, याचा शोध घेणे गरजेचे आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून खरे आणि त्याला मदत करणारे गटसचिव, संचालक व अन्य व्यक्तींविरूद्ध कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा बँकेच्या सभासदांकडून होत आहे.

मी माझे पैसे घेण्यासाठी दिंडोरी येथे गेलो होतो. त्यामुळे या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. इतके पैसे मी स्वीकारले नाही. : विलास पेखळे, गटसचिव

यांची चौकशी केल्यास सत्य उजेडात येईल

गटसचिव विलास पेखळे आणि देवीदास नाडे यांनी दिंडोरी येथील शाखेतून एकाचवेळी २७ लाख रुपये रोख स्वरूपात काढल्याचे आपलं महानगरच्या हाती आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. तसेच, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाखा अधिकार्‍याला दमात घेत पैशांची व्यवस्था करण्याचा आदेश देत असल्याचे ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. पैसे काढताना गटसचिवांसोबत एका माजी अध्यक्षाचा स्वीय सहायक तसेच दिंडोरीतील ज्येष्ठ संचालकदेखील उपस्थित होते. त्यामुळे एवढी मोठी रक्कम नेमक्या कुणाच्या खिशात गेली याचा तपास होणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -