खरेंचे खोटे कारनामे : जिथे ‘उद्योग’ केले त्याच उपनिबंधक कार्यालयात खरेची चौकशी, नावाची पाटीही जैसेथे

नाशिक : लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याला तपासासाठी लाचलुचप्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१७) जिल्हा उपनिबंधक कार्यालयात नेले होते. उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या खरे याला पाहून अधिकारी, कर्मचारी व नागरिकांमध्ये दिवसभर उलटसुलट चर्चा सुरु केली.

लाचखोर सतीश खरे याला मंगळवारी (दि.१६) न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वेगाने तपास सुरु केला आहे. तीन दिवसांमध्ये खरेविरोधात अधिकाधिक पुरावे गोळा करण्यासाठी पथके खरेशी संबंधित असलेल्या आथिक व्यवहारांची तपासणी करत आहेत. खरे याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून लाचेची मागणी केली असल्याने पथकाने त्या दिशेने तपास सुरु केला आहे. पथकाने बुधवारी खरे यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयात नेले होते. यावेळी कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिकसुद्धा उपस्थित होते. पथकाने खरे याला तपासासाठी कार्यालयात आणल्याचे पाहून त्यांच्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. खरे याला ३० लाख रुपये लाच घेताना एसबीने अटक केली असली त्याला त्याचे काहीच वाटत नव्हते. कार्यालयात तो काहीच झाले नाही, असे दाखवत होता.

सतीश खरेंचा तिरसट स्वभाव

जिल्हा उपनिबंधक सतीश खरे हे तिरसट स्वभावाचे आहेत. ते कार्यालयात कर्मचार्‍यांशी सरळ व शांतपणे बोलत नाहीत. ते तापट स्वभावाचे असल्याने कर्मचार्‍यांशी अल्पसंवाद साधतात. ते कार्यालयात येणार्‍या अभ्यांगतांशी नीट बोलत नाहीत, त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयातील काही कर्मचारी आणि अभ्यांगतांमध्ये खरेंविषयी राग निर्माण झाला होता. खरे यांना लाच घेताना अटक झाल्याचे समजताच अनेक कर्मचारी व अभ्यांगत आनंदीत झाले. बरे झाले भ्रष्टाचारी अधिकार्‍यावर कारवाई झाली, असे कर्मचारी व अभ्यांगत म्हणत होते. खरे यांना पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणले त्यावेळी अनेक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांना पाहून ते म्हणाले की, इतके फोटो कशासाठी काढता, बास करा. विशेष म्हणजे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी कायदेशीर कारवाई करत असताना ते काहीच झाले नाही, असे दाखवत होते. त्यांचे हावभाव अगदी सराईत लाचखोरासारखे होते. ते पाहून अधिकारी व कर्मचारी अवाक झाले.

एस. वाय. पुरी यांच्याकडे जिल्हा उपनिबंधकपदाचा पदभार

तात्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केल्यानंतर विभागीय सहनिबंधक कार्यालयाने तात्काळ खरे यांचा जिल्हा उपनिबंधकपदाचा पदभार सहनिबंधक सहकारी संस्था (आदिवासी विकास) चे एस. वाय. पुरी यांच्याकडे सोपविला आहे. पुरी यांनी मंगळवारी (दि.१६) या पदाचा पदभार स्वीकारत कामकाजास सुरवात केली. नाशिक रोड व्यापारी सहकारी बँक निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारीपदाचा देखील पदभार पुरी यांच्याकडे आला आहे. दरम्यान, खरे यांनी सोमवारी घेतलेल्या सुनावणी वादात सापडल्या आहेत. त्यामुळे एस. वाय. पुरी यांच्याकडून या प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी प्रक्रीया घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.