26/11 हल्ला : तहव्वूर राणाचे भारताकडे होणार प्रत्यार्पण; फडणवीसांचा पाकिस्तानवर आरोप

मुंबई : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा (tahavur rana) याच्या भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेच्या न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा खरपूस समाचार घेत महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी म्हटले की, अमेरिकेच्या न्यायालयाच्या निकालामुळे 26/11 हल्ल्यामागे पाकिस्तानची भूमिका असल्याचे लवकरच स्पष्ट होईल.

पाकिस्तानमधून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत भीषण दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण 166 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईतील प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या ठिकाणी हे हल्ले 60 तासांहून अधिक काळ सुरू होते. या हल्ल्यातील दोषी दहशतवादी पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिसमधील फेडरल जेलमध्ये बंद आहे. त्याचे प्रत्यार्पण भारताकडे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर कॅलिफोर्निया न्यायालयाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे 15 वर्षांनंतर भारताला महत्त्वाचा विजय मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका महिन्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या निमंत्रणावरून आपल्या पहिल्या राज्य दौऱ्यावर अमेरिकेला जात असताना हा निर्णय आला आहे.

कॅलिफोर्निया न्यायालयात 16 मे रोजी सुनावणी पार पडली. यावेळी यूएस डिस्ट्रिक्ट कोर्ट सेंट्रल डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्नियाच्या न्यायदंडाधिकारी जॅकलीन चूलजियन 48 पानांच्या आदेशात म्हटले की, न्यायालयाने विनंतीचे समर्थन आणि विरोधात युक्तिवादासाठी सुनावणीच्या वेळी सादर सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे पुनरावलोकन व विचार केला आहे. ज्या गुन्ह्यांसाठी त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती करण्यात आली होती, त्या गुन्ह्यांसाठी राणा प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. त्यानंतर भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा आदेश बुधवारी (17 मे) जारी करण्यात आला.

पाकिस्तानवर अनेक करारानुसार निर्बंध लावता येतील
तहव्वूर राणांच्या प्रत्यार्पणाबद्दल गुरुवारी (18 मे) पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता हे सर्वांनाच माहिती आहे. मोदी सरकार आणि एनएसएने या प्रकरणात पुढाकार घेतला. त्याचा परिणाम आज आपण पाहू शकतो. आता राणाचे भारताकडे प्रत्यार्पण होत असल्यामुळे या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे कायदेशीररित्या सिद्ध होईल. त्यामुळे पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करून त्यांच्यावर संयुक्त राष्ट्रांच्या अनेक करारांनुसार विविध निर्बंध लागू करण्यास मदत होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.