घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : ठाकरे गटाच्या जागा भाजपा लढविणार; शिंदे गट पाणी...

Lok Sabha 2024 : ठाकरे गटाच्या जागा भाजपा लढविणार; शिंदे गट पाणी सोडणार?

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने देशातील वातावरण तापत आहे. महाराष्ट्रात महायुती तसेच महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. तथापि, भाजपाचा शिंदे गटाकडे असलेल्या काही जागांबरोबरच ठाकरे गटातील जागाही लढविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या जागा शिंदे गट सोडणार का, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Politics: नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे एकत्र येणारच; ‘या’ नेत्याच्या दाव्याने राजकारणात चर्चांना उधाण

- Advertisement -

साधारणपणे चार महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी भाजपा 26 जागा, तर शिवसेना आणि अजित पवार गट मिळून 22 जागा लढविण्याचे प्रस्तावित असल्याचे म्हटले होते. त्यानंतर लोकसभेच्या जागांचा फॉर्म्युला हा चर्चेनंतरच ठरेल, पण जो पक्ष ज्या जागा लढला, त्याला साधारणपणे त्या जागा जाव्यात, हे त्याचे सूत्र असले, असा खुलासा त्यांनी केला. पण त्याचबरोबर हेच सूत्र कायम असेल असे नाही, तर, आपापसात चर्चा करून त्यात बदलही आम्ही करू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती.

सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 25 तर शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपाने 23 तर, शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. पण आता भाजपा 32 जागा लढविणार असल्याचे सांगण्यात येते. अधिकच्या सात जागांपैकी पाच जागा ठाकरे गटाकडे असलेल्या तर, दोन जागा शिंदे गटाच्या आहेत, असे सांगितले जाते.

- Advertisement -

हेही वाचा – Gokhale Bridge : रेल्वेने सांगितले तसेच केले…, गोखले पुलाबाबत मुंबई महापालिकेने दिले कारण

शिवसेनेने ज्या जागा लढविल्या आहेत, त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. म्हणजेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असलेल्या पाच जागांवर देखील उमेदवार उभे करण्याचा मनसुबा शिंदे गटाचा असला तरी, भाजपा त्याला सुरूंग लावण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचे उघड झाले आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या जागेवर दावा केला आहे. त्यापाठोपाठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत, ही जागा भाजपाची आहे आणि भाजपाच ती लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आहेत. पण तेथून भाजपा नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे

तर, धाराशिव येथील ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे खासदार असले तरी, तेथून राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपाकडून तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. तीच स्थिती परभणीची आहे. तेथील विद्यमान खासदार ठाकरे गटाचे संजय जाधव आहेत. पण भाजपा या मतदारसंघातून रामप्रसाद बोर्डीकर यांना तिकीट देण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या सहापैकी तीन जागा भाजपाकडे असून दोन जागा शिंदे गट आणि एक जागा ठाकरे गटाकडे आहे. दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या जागेवर शिंदे गटाचा दावा असला तरी, येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तिकीट देण्याचे भाजपाने जवळजवळ निश्चित केले आहे. तर, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या उमेदवारीवरून गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात वाद झाला होता. पण आता हीच जागा भाजपाला हवी असल्याचे सांगण्यात येते. मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये हेमंत पाटील हे शिंदे गटाचे खासदार आहेत. नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यावेळी ही जागा माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार हे भाजपाच्या तिकिटावर लढविणार असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा – Politics: राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील? राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या कुंडलीत…

भाजपाकडे ठाणे की कल्याण?

ठाणे आणि कल्याण हे दोन्ही मतदारसंघ फुटीआधी शिवसेनेकडेच होते. पण आता ठाणे ठाकरे गटाकडे तर, कल्याण शिंदे गटाकडे आहे. कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे खासदार आहेत. त्यांच्या या मतदारसंघावर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आधीपासूनच दावा केला आहे. त्यांच्याच मतदारसंघाचा भाग असलेल्या कल्याण पूर्वचे आमदार आणि भाजपा नेते गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे वैर सर्वश्रुत असून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड हे सध्या तुरुंगात आहेत.
ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आहेत. ठाणे हा मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असला तरी भाजपाचा त्यावर डोळा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कल्याण श्रीकांत शिंदे यांच्याकडेच ठेवून ठाण्यावर भाजपा दावा करू शकते.

एकूणच, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपासून आतापर्यंत शिंदे गटाने घेतलेली भूमिका लक्षात घेता, या सर्व जागांवर शिंदे गटाला पाणी सोडावे लागेल, असा जाणकारांचे मत आहे.

हेही वाचा – Pune Metro : रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रोला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -