घरमहाराष्ट्रपरमबीर सिंहांना हटवले उपाध्याय होमगार्डचे महासंचालक

परमबीर सिंहांना हटवले उपाध्याय होमगार्डचे महासंचालक

Subscribe

राज्यातील पोलीस विभागात पुन्हा एकदा मोठे फेरबदल

राज्यातील पोलीस विभागात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. दोन वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांची गुरुवारी बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. के. उपाध्याय म्हणजेच डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांना बढती देण्यात आली असून ते आता गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक असतील. बी. के. उपाध्याय यांची परमबीर सिंहांच्या जागी नियुक्ती करीत त्यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. के. उपाध्याय यांच्या नियुक्तीचे 20 जानेवारीला आदेश काढले.

काही महिन्यांपूर्वीच परमबीर सिंह यांना महाराष्ट्र होमगार्डचे प्रमुख करण्यात आले होते, पण ते ड्युटीवर हजर झालेच नाहीत. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी 29 ऑगस्टपर्यंत रजा घेतली होती. मात्र, त्यानंतरही ते कर्तव्यावर परतले नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांचा पदभार नागरी संरक्षण विभागाचे पोलीस महासंचालक के. वेंकटेशम यांच्याकडे देण्यात आला होता. मार्चमध्ये परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतरच त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली.

- Advertisement -

खंडणीचे पाच गुन्हे
अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडानंतर परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांच्याविरोधातही तक्रारी येऊ लागल्या होत्या. मुंबई आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यानंतर अटकेच्या भीतीने आजारी असल्याचे कारण दाखवत मे महिन्यात ते सुट्टीवर गेले होते. चौकशीसाठी समन्स पाठवूनदेखील ते हजर राहत नव्हते. तपास यंत्रणांच्या रडारवरूनही ते दिसेनासे झाल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते प्रगटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -