घरमहाराष्ट्रगाळामुळे मांडवा-मुंबई रो-रो सेवा रखडली

गाळामुळे मांडवा-मुंबई रो-रो सेवा रखडली

Subscribe

मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातील मांडावा समुद्रमार्गे रो-रो सेवेसाठी मांडवा येथील जेटी आणि टर्मिनलचे काम पूर्ण झालेले आहे. मांडवा येथे गाळ साचत असल्यामुळे ही सेवा सुरु होण्यात अडचणी येत आहेत. सध्या मांडवा येथे गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने ही सेवा सध्यातरी गटांगळ्या खात आहे.

एकेकाळी कोकणात मालाची आणि प्रवासी यांची ने आण करण्यासाठी जलवाहूतक हे एकमेव साधन होते. मुंबईतील भाऊचा धक्का ते अगदी गोव्यापर्यंत या बोटी जात होत्या. पण पुढे गावागावात रस्त्यांचे जाळ विणले गेले. एस. टी. खेडोपाडी पोहोचली आणि 1972 च्या सुमारास प्रवासी जलवाहतूक बंद पडली. आता केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत देशातील 14 राष्ट्रीय जलमार्गांना मंजुरी मिळाली. पहिल्या टप्प्यात भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मांडवा येथे प्रवासी टर्मिनल, जेटी आणि ब्रेक वॉटर पार्किंग अशा सुविधांसह अद्ययावत बंदर उभं राहिले आहे, परंतु अद्याप ही सेवा सुरू झालेली नाही.

- Advertisement -

ही सेवा गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते. मात्र 2019 चा मार्च महिना उजाडला तरी रो-रो सेवा कार्यान्वित होऊ शकलेली नाही. रो-रो टर्मिनल परिसरात प्रचंड प्रमाणात गाळ साचत असल्याने मोठ्या बोटींच्या वाहतुकीत अडचणी येत आहेत. या भागात साचणारा गाळ ही या रो-रो सेवेच्या मार्गातील मोठी अडचण असल्याचे बोलले जाते. गेल्या वर्षी 16 कोटी 54 लाख रुपये खर्चून गाळ काढल्यानंतर आता पुन्हा एकदा मांडवा येथील रो-रो टर्मिनल जवळ गाळ काढण्याचे काम सुरू होत आहे. यासाठी मेरीटाइम बोर्डाने 4 कोटी 53 लाख रुपये खर्चाच्या गाळ उपसण्याच्या कामाला मंजुरी दिली आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्ट तर्फे भाऊचा धक्का ते मांडवा या जलमार्गावर प्रायोगिक वाहतुकीसाठी ‘रॉ-पॅक्स’ या अजस्त्र जहाजाची खरेदी केली जाणार आहे. यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र सागरी महामंडळ, तसेच शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) प्रत्येकी 10 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करतील. या सेवाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुढे ती नवी मुंबई विमानतळाला जोडण्याचा मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाचा विचार आहे. या जहाजातून सुमारे 80 गाड्या आणि 200 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -