घरताज्या घडामोडीब्लू प्रिंट ते भोंगा...राज एक्स्प्रेसने ट्रॅक बदलला

ब्लू प्रिंट ते भोंगा…राज एक्स्प्रेसने ट्रॅक बदलला

Subscribe

महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट, मराठी माणूस यावरून थेट हिंदुत्व, मशिदीवरील भोंगे उतरवापर्यंत राज येऊन ठेपले आहेत. दोन चार डबे रुळावरून घसरले तर परत उचलून ठेवता येतात. जर इंजिनच घसरले तर काय करायचं? राज यांच्या भाषणानंतर मनसे आगामी राजकारण भाजपच्या वळचणीला राहून करण्याच्या तयारीत दिसतेय. मात्र, भाजपसोबत राहून काय होते हे शिवसेनेला कळून चुकले आहे. त्यामुळे राज यांचा हा निर्णय कितपत फायदेशीर ठरतोय हे पहावे लागेल.

दोन वर्षांनंतर मनसेचा शनिवारी पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केल्याचे काहीजण म्हणतात. ते म्हणणारे कोण हे सर्वांना दिसले. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापासून राज ठाकरे काय बोलणार? कोण टार्गेटवर असणार अशा चर्चा सुरू होत्या. राज ठाकरेंच्या भाषणाने अनेकजण खूश झाले. मात्र, राज ठाकरेंचे भाषण हे नेहमीसारखे जानदार नव्हते, अशी प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहे. राज ठाकरे हे रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. राज ठाकरेंनी भाषण सुरू करताना सुरुवातीलाच दोन वर्षं मोरी तुंबली आहे, आज शक्य तेवढी साफ करतो असे म्हटले. जेव्हा राज ठाकरेंचे भाषण संपले तेव्हा सर्वांना कळून चुकले की नेमकी कशामुळे मोरी तुंबली.

राज ठाकरे यांच्या भाषणात महागाई, बेरोजगारी आदी लोकांच्या हिताचे विषय असायला हवे होते, अशी सर्वसामान्यांची इच्छा होती. मात्र, राज ठाकरेंच्या भाषणात काय होते तर शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि….हिंदुत्त्व, मशिदीवरचे भोंगे, हनुमान चालिसा. सर्वांना राज ठाकरे माहिती होते ते महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट दाखवणारे. मात्र, ब्लू प्रिंटपासून सुरू झालेला प्रवास मशिदीवरच्या भोंग्यांवर येऊन पोहोचलाय. त्यामुळे आता राज एक्स्प्रेसचा ट्रॅक बदलला आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्यावर आक्रमक हिंदुत्वाची जी शिवसेनेची पोलिटिकल स्पेस होती ती राज ठाकरे आणि त्यांची ‘मनसे’ घेऊ शकते अशी चर्चा होती. राज ठाकरेंनी त्याच दिशेने पावले टाकली आहेत. गुढीपाडव्याचे भाषणदेखील त्याच सुराचे होते. महाराष्ट्रात जातीपातीवरून भांडणे, राजकारण सुरू आहेत. आम्ही जातीच्या बाहेर जात नाही. कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार आहोत? हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत, असा सवाल राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केला. राज ठाकरे यांनी पुढे जाऊन मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे उतरवावेच लागतील.

सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाही तर ज्या मशिदीवर भोंगे आहेत, त्या मशिदीसमोर स्पिकर लावून हनुमान चालिसा लावा, म्हणून कार्यकर्त्यांना जाहीरपणे आदेश दिले. काही मिनिटांआधी महाराष्ट्रात जातीपातीवरून भांडणे, राजकारण सुरू आहे म्हणणारे राज ठाकरे दुसर्‍या मिनिटाला मशिदीसमोर स्पीकर लावून हनुमान चालिसा लावा म्हणून कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगतात. किती तो विरोधाभास? राज ठाकरेंच्या या भाषणाने तिथे जमलेल्या अनेक मनसैनिकांना त्यांचे राजसाहेब काय बोलताहेत हेच कळेना. राज ठाकरेंच्या भाषणात मिनिटा-मिनिटाला टाळ्या पडतात. मात्र, शनिवारच्या भाषणात कितीवेळा टाळ्या, शिट्या वाजल्या?

- Advertisement -

राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात भाऊ उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील भाष्य केले. याशिवाय पुढे जाऊन त्यांनी ज्यांची त्यांनी मुलाखत घेतली होती त्या शरद पवारांवर तर त्यांनी गंभीर आरोप केले. शरद पवार आणि त्यांचा पक्ष जातीयवादी आहे, असा आरोप राज यांनी केला. हे तेच राज आहेत ज्यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. राज यांची भूमिका प्रत्येक निवडणुकीत बदलताना दिसली आहे. माझे निवडून आलेले खासदार दिल्लीत मोदींचे हात बळकट करतील. मोदींनी जसा गुजरातचा विकास केला तसा देशाचा विकास करावा, असे २०१४ साली राज म्हणाले होते. त्यानंतर २०१९ साली मोदींना पूर्वी पाठिंबा दिला याचा आज पश्चाताप होत आहे. गुजरातचा मला दाखवण्यात आलेला विकास हादेखील खोटा होता.

प्रत्येक सभेत व्हिडिओ लावून मी भाजपला उघडे पाडणार आहे असे सांगत २०१९ साली लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदी सरकारची चिरफाड करत होते. त्यानंतर आलेली ईडीची नोटीस आणि शांत झालेले राज ठाकरे. तथापि, आता राज यांना उत्तर प्रदेशमध्येदेखील विकास दिसू लागला आहे. मुंबई, पुणे, नाशिक सगळ्या शहरांची वाताहत होत आहे. मला आनंद आहे की उत्तर प्रदेशमध्ये खरा विकास होत आहे, असे राज ठाकरे म्हणाले. राज यांच्या या वक्तव्याने अनेकांनी कपाळावर हात मारलेत. कोरोनाच्या काळात नद्यांमधून मृतदेह वाहत होते; लखीमपूर खेरीमध्ये शेतकर्‍यांवर गाडी चढवून मारून टाकले जाते त्या यूपीत राज यांना विकास दिसतो. ज्या राज्यातून लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात येत आहेत, त्या यूपीत राज यांना विकास दिसतोय. राज आपल्या भाषणात पुरते गोंधळले आहेत, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

राज्यात काही महिन्यांतच मुंबईसह काही प्रमुख शहारांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्यादेखील निवडणुका होणार आहेत. त्याआधी पंजाबमध्ये मिळालेल्या यशानंतर आम आदमी पक्षाला हुरुप आला असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हा पक्ष उतरणार आहे. त्यामध्ये तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राज ठाकरे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, राज यांनी घोर निराशा केली. राज यांना महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपला पर्याय देण्याची संधी होती. मात्र, ती संधी राज ठाकरे गमावताना दिसत आहेत. २०१२ साली स्थापन झालेल्या आपने १० वर्षांत दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली. मात्र, मनसेला १६ वर्षांत निवडून आलेले आमदारदेखील टिकवता आलेले नाहीत. केजरीवाल यांच्यासारखेच प्रेम एकेकाळी महाराष्ट्रात राज ठाकरे यांना मिळाले होते. पण राज यांची ‘ब्लू प्रिंटच’ हरवली आहे, असे आता वाटू लागले आहे.

महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट, मराठी माणूस यावरून थेट हिंदुत्व, मशिदीवरील भोंगे उतरवापर्यंत राज येऊन ठेपले आहेत. दोन चार डबे रुळावरून घसरले तर परत उचलून ठेवता येतात. जर इंजिनच घसरले तर काय करायचं? राज ठाकरेंनी दिलेल्या मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू या इशार्‍यानंतर मनसैनिकांनी आक्रमक होत घाटकोपरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावली. यामुळे त्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. काही वेळातच पोलिसांनी तिथून स्पीकर आणि अतिउत्साही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

या प्रकाराकडे आपण पाहिले तर अशा पद्धतीचे चित्र उत्तरेकडील राज्यांमध्ये पाहिले आहे. आता ते चित्र पुरोगामी महाराष्ट्रात दिसायला लागले आहे. काही वर्षांपूर्वी हातात महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ घेऊन जनतेसमोर जाणार्‍या या नेत्यावर आता मनसैनिकांना मशिदींसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’चे पठण करण्याची हाक देण्याची वेळ येणे, हा राज ठाकरे यांचा पराभवच आहे. सुरुवातीच्या काळात परप्रातीयांना लक्ष्य करत ‘खळ्ळ खट्याक’ अशी नवी ‘राजभाषा’ आणणार्‍या मनसेवर आपल्या सैनिकांना मराठी ‘भीमरूपी महारूद्रा…’ ऐवजी हिंदी ‘हनुमान चालिसा’ पठणाचा आदेश द्यावा लागणे, हे आता त्यांच्या राजकारणाने कशी कोलांटउडी घेतली आहे, तेच दाखवून देत आहे.

राज ठाकरे यांनी माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीये, विठ्ठलाभोवती जमलेल्या बडव्यांशी आहे, असे म्हणत शिवसेनेला रामराम ठोकत नव्या पक्षाची स्थापन केली. २००६ साली पक्ष स्थापन केल्यानंतर ३ वर्षातच पक्षाला विधानसभेमध्ये चांगले यश मिळाले होते. पहिल्याच निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आले. मात्र, ही संख्या पुढे वाढवण्यात त्यांना अपयश आले आहे. इतकेच नव्हे तर जी संख्या मिळाली होती ती टिकवणेही त्यांना जमले नाही. आज राज यांचा एकच आमदार आहे. अशातच आता राज यांच्या भाषणानंतर मनसे आगामी राजकारण भाजपच्या वळचणीला राहून करण्याच्या तयारीत दिसतेय. मात्र, भाजपसोबत राहून काय होते हे शिवसेनेला कळून चुकले आहे. त्यामुळे राज यांचा हा निर्णय कितपत फायदेशीर ठरतोय हे पहावे लागेल. राज यांच्या भाषणाला मोठी गर्दी होते.

मात्र, मतपेटीत त्याचे रूपांतर होताना दिसून येत नाही. हे का होते हेदेखील राज यांना तपासून पहायला हवे. त्यांनी बदललेल्या भूमिकेमुळे त्यांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होतं का हे पहावं लागेल. कारण, मशिदींवरून भोंगे काढण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने मागेच दिलेला आहे, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. एकेकाळी रस्त्यावरील नमाजला शिवसेनेने महाआरत्यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्या महाआरत्या मागे पडल्या. आता शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसाने आव्हान द्यायचे ठरवले आहे. पण मनसेचे भोंगे पोलिसांनी उतरवले आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना, भाजपचा भोंगा शिवाजी पार्कवर वाजला, अशी हेटाळणी केली. या सगळ्यावर मात करून राज यांना पुढे येऊन आपली छाप महाराष्ट्राच्या जनमनावर उमटवावी लागणार आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -