घरमहाराष्ट्रST Workers Strike : राज्यातील ९१८ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन, कर्मचारी संपावर ठाम

ST Workers Strike : राज्यातील ९१८ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन, कर्मचारी संपावर ठाम

Subscribe

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं राज्य शासनात विलीन करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता MSRTC कडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. परंतु राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही आंदोलक एसटी कर्मचारी संप मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येतेय. दरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर आता MSRTC ने कारवाईला सुरुवात केली आहे. १० नोव्हेंबराला राज्यातील ५४२ कर्मचाऱ्यांवर महामंडळाने कारवाई केली. तर संपावर गेलेल्या ३७६ कर्मचाऱ्यांना बुधवारी MSRTC ने निलंबित केले. त्यामुळे आता कारवाई करण्यात आलेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ९१८ वर पोहचली आहे. परंतु आजही सांगली, चंद्रपूर, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणच्या डेपोमधील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे राज्यभरातील २५० एसटी डेपोमधील एसटी वाहतूकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान अनेक एसटी आगारांमधील विश्रामगृहांतून एसटी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले जातेय. परंतु तरीही जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय.

अशातच आज एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या आहेत. यावेळी राज ठाकरेंनी आधी आत्महत्या थांबवा मग नेतृत्त्व करेन असे आश्वासन दिले आहे. दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन केले होते. एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात बाहेरचे नाहीत. मात्र सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

- Advertisement -

परंतु आज सलग १४ व्या दिवशी एसटी कर्मचारी संप करत आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती स्थापन करण्य़ाचे आदेश दिले आहेत. तर राज्य सरकारनेही यासंदर्भात शासननिर्णय काढला. ज्यात कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्यामुळे ही कारवाई येईल असे सांगण्यात आले.

दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एसटी महामंडळाने ३४३ संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली. यावर संबंधितांनी शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. १५ नोव्हेंबरला याविषयीची पुढची सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -