घरताज्या घडामोडीराज्यातील साखर पट्ट्यातील टॉप 100 व्यक्ती, संस्थांनी वीजबिलाचे कोट्यावधी रूपये थकवले

राज्यातील साखर पट्ट्यातील टॉप 100 व्यक्ती, संस्थांनी वीजबिलाचे कोट्यावधी रूपये थकवले

Subscribe
राज्यात विजेच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस मोठ्या संख्येच्या दिशेने फुगत आहे. पण राज्यातील कृषी पंपांची थकबाकीही यामध्ये सर्वाधिक अशी आहे. राज्यातील साखर कारखानदार असलेल्या पट्ट्यातून मोठी विजेची थकबाकी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये अवघ्या 100 थकबाकीदारांकडेच 9 कोटींहून अधिक रक्कम थकीत असल्याचे समोर आले आहे. राज्यात कृषीपंपधारक शेतकऱ्यांची थकबाकी ही 42 हजार कोटींवर पोहचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक मोठे थकबाकीदार हे ऊस उत्पादन होणाऱ्या भागातून समोर आले आहेत.

टॉप 100 मध्ये कोणत्या व्यक्ती, संस्थांचा समावेश ?

राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यात सर्वाधिक  थकबाकी असलेल्या  १०० व्यक्ती वा संस्था असून त्यांच्याकडे एकूण ९ कोटी २८ लाख ९० हजार ६०० रूपये इतकी थकबाकी जमा आहे. १०० पैकी सर्वाधिक ३२ थकबाकीदार हे अहमदनगर जिल्ह्यातील, त्यानंतर २१ थकबाकीदार हे पुणे जिल्ह्यातील तर १६ थकबाकीदार हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. रोख पीक म्हणून ओळखल्या जाणा-या साखरेच्या पट्ट्यातील ६ जिल्ह्यात १०० पैकी सर्वाधिक ८१ थकबाकीदार आहेत.
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात २, बीड जिल्ह्यात एक , नांदेड जिल्ह्यात १० असे  १०० सर्वाधिक थकबाकीदारांपैकी एकूण १३ थकबाकीदार आहेत. विदर्भात नागपूर  व अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एक असे केवळ दोन थकबाकीदार या यादीत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ४ थकबाकीदार आहेत. राज्यातील १० कृषीपंप थकबाकीदारांकडे सर्वाधिक  एकूण १,५७,२२,२०० इतकी रक्कम थकित आहे.राज्यातील सर्वाधिक १० थकबाकीदारांचे नाव,
महाराष्ट्रात कृषी ग्राहक वीजपुरवठादारांची थकबाकी ही ४२ हजार कोटी रुपयांच्यावर पोहचली असून त्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या १०० व्यक्ती वा संस्थांकडे ९.२८ कोटींहून अधिक रक्कम थकित आहे.
राज्यातील सर्वाधिक कृषी पंप थकबाकी ही पुणे जिल्ह्यातील सायगाव येथील  शेतकरी सुभकांत पंढरीनाथ काळे यांच्याकडे असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्यातीलच सी.श्रीनाथ पी.पी. मंडळी यांच्याकडे  आणि तिस-या क्रमांकावर औरंगाबाद जिल्ह्यातील देवराव शिर यांच्याकडे थकबाकी आहे. सर्वाधिक थकबाकीची रक्कम कृषी पंप धोरणांतर्गत ५० टक्के माफ केल्यानंतरची आहे. ५० टक्के सवलत मिळूनही हे कृषी पंप धारक आपली थकबाकी जमा करत नसल्याचे दुर्देवी चित्र या निमित्ताने उघड झाले आहे.

कृषी पंप थकबाकीदारांकडे असलेल्या थकबाकीचा अभ्यास राज्याच्या ऊर्जा विभागाने  आणि महावितरणने सुरू केला आहे. या अभ्यासात महावितरणची राज्यातील सर्वाधिक थकबाकी असलेल्या १०० शेतक-यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीचा अभ्यास केल्यानंतर १० लाखांहून अधिक थकबाकी असलेले २० शेतकरी वा संस्था राज्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या २० थकबाकीदारांकडे एकूण २ कोटी ६३ लाख ८२ हजार ४१० रूपये थकित आहेत. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेत कृषीपंप धोरण आखले असून सप्टेंबर २०२० पर्यंतच्या थकबाकीतील ५० टक्के रक्कम माफ करण्यात आली आहे. त्यानंतर सप्टेंबर २०२० पासून आजवरच्या चालू बिलाची रक्कम जोडून या धोरणांतर्गत  देय थकबाकीचा आकडा महावितरणने जारी केला आहे.

सदर थकबाकीदार हे प्रत्येकी १० लाख रुपयांपासून ३३ लाख रुपयांपर्यंत महावितरणचे थकीत वीज बिल देणे आहे. या थकबाकीदारांमुळे महावितरणवर कर्जाचा डोंगर मोठया प्रमाणात वाढत चालला आहे.


Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -